मसाप चोपडा शाखेचा पुण्यात गौरव; 'उत्कृष्ट शाखा पुरस्कार' प्रदान

 मसाप चोपडा शाखेचा पुण्यात गौरव; 'उत्कृष्ट शाखा पुरस्कार' प्रदान



चोपडा दि.२९(प्रतिनिधी)- शतकोत्तर वाटचाल करणाऱ्या महाराष्ट्र साहित्य परिषद या आद्य संस्थेच्या राज्यभर विखुरलेल्या शाखा परिषदेच्या रक्तवाहिन्या असून त्यांच्या माध्यमातून मराठी भाषेची सेवा करण्याचे कार्य परिषद करत असल्याचे सांगत चोपडा (जि. जळगाव) मसाप शाखेचा राजा फडणीस पुरस्कृत 'महाराष्ट्र साहित्य परिषद उत्कृष्ट शाखा पुरस्कार' देऊन गौरव करण्यात आला.

         २७ मे रोजी पुणे येथे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात मसापचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते व भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम (मसाप विश्वस्त मंडळ अध्यक्ष), शिखर बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनासकर, दिलीप राज प्रकाशन चे राजीव बर्वे तसेच प्रसिद्ध लेखक 'उचल्या'कार लक्ष्मण गायकवाड, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. गीताली वि. मं., परिषदेच्या कार्यवाह सुनिता राजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी या मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या १२० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या पुरस्कार वितरण सोहळ्यात शाखेला फिरता करंडक व रोख रक्कम स्वरूपातील हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. चोपडा शाखेच्या वतीने शाखेचे संस्थापक अध्यक्ष कवी अशोक सोनवणे, उपाध्यक्ष प्राचार्य राजेंद्र महाजन, कार्याध्यक्ष विलास पं. पाटील, कार्यवाह संजय बारी सदस्य रमेश शिंदे, प्रभाकर महाजन यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 

          या कार्यक्रमात भटक्या विमुक्तांचे जगणे आपल्या लेखणीद्वारे प्रभावीपणे मांडणारे 'उचल्या'कार लक्ष्मण गायकवाड यांना डॉ. अंजली सोमण पुरस्कृत 'मसाप जीवन गौरव पुरस्कारा'ने तर स्त्रीवादी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. गीताली वि. मं. यांना 'डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कारा'ने तसेच साहित्य प्रेमी भगिनी मंडळाच्या डॉ. मंदा खांडगे यांना 'मसाप स्नेहबंध पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले. वैशिष्टपूर्ण शाखेचा पुरस्कार पलूस (जि. सांगली) या शाखेस व मसाप कार्यकर्ता पुरस्कार जयंत येलुलकर व श्रीकृष्ण पुरंदरे यांना प्रदान करण्यात आला.

        यावेळी लक्ष्मण गायकवाड, डॉ. गीताली, डॉ. मंदा खांडगे यांनी मनोगते व्यक्त केली तर डॉ. रावसाहेब कसबे यांनी पुरस्कारार्थींचे अभिनंदन करत अध्यक्षीय भाषणातून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी तर सूत्रसंचालन अंजली कुलकर्णी यांनी व आभार प्रदर्शन विनोद कुलकर्णी यांनी केले. मसापचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी प्राचार्य तानसेन जगताप (चाळीसगाव) यांच्यासह महाराष्ट्रभरातील परिषदेचे कार्यकर्ते व अनेक साहित्यिक उपस्थित होते.

         शाखेला मिळालेल्या या पुरस्कारामुळे शाखेच्या कार्याला अधिक बळ मिळणार असून पुढील काळात विविध साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात येणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने