पंकज नगर परिसरात एकाच दिवशी १२० नळ कनेक्शन जोडणी.. मोठ्या प्रमाणावर लाभ घेण्याचे मुख्याधिकारींचे आवाहन

पंकज नगर परिसरात एकाच दिवशी १२० नळ कनेक्शन जोडणी.. कॅम्पचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेण्याचे मुख्याधिकारींचे आवाहन 

चोपडा दि.१७(प्रतिनिधी)नगरपरिषदेतर्फे *चोपडा नगरपरिषद आपल्या दारी* उपक्रमान्वये अमृत-२ योजनेअंतर्गत शहरातील ज्या भागात रस्त्यांचे काम सुरू होणार आहे. त्या भागात प्राधान्याने जुन्या पाईपलाईन वरून नव्या पाईपलाईन वर नळ कनेक्शन विनामूल्य देण्याची मोहीम चोपडा शहरात सुरू आहे. जेणेकरून नागरिकांना रस्ते बनल्यानंतर नळ कनेक्शन घेतांना, रस्ते नुकसानीचा भुर्दंड बसू नये  म्हणून हा उपक्रम हाती घेण्यात आला असल्याची मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी दिली आहे.

           चोपडा नगरपरिषद आपल्या दारी योजनेअंतर्गत १६ एप्रिल व १७ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ८.०० वाजेपासून ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत व दुपारी ४.०० वाजेपासून ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत बोरोलेनगर १, बोरोलेनगर २, रत्नदीप नगर, रामकुवर नगर, पंकज नगर, अनंत नगर आणि लगतच्या भागातील नागरिकांना १२० नळ कनेक्शन जुन्या पाईपलाईन वरून नवीन पाईपलाईनवर विनामूल्य देण्यात आलेले आहेत. त्यासोबतच घरपट्टी-पाणीपट्टी भरणा सुविधा, नागरिकांना पाच प्रकारच्या ऑनलाइन तक्रार नोंदवण्यासाठी QR कोड, काही समस्या असल्यास जागीच तत्काळ निवारण व पंतप्रधान आवास योजनेचे माहिती कक्ष देखील चोपडा नगरपरिषद आपल्या दारी मोहिमे अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तसेच चोपडा नगरपरिषद आपल्या दारी मोहिमेअंतर्गत शहरातील विविध भागात टप्प्याटप्प्याने नवीन रस्ते प्रायोजित असलेल्या ठिकाणी प्राधान्याने जुन्या पाईपलाईनवरून नवीन पाईपलाईन वर नळ कनेक्शन विनामूल्य देण्यासाठी कॅम्प लावण्यात येतील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

          तरी सदर मोहीम व कॅम्पचा शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री राहुल पाटील, मुख्याधिकारी, नगरपरिषद चोपडा यांनी केलेले आहे.या प्रसंगी  संदीप गायकवाड कर अधिकारी , प्रणव पाटील कर निरीक्षक, जितेंद्र मोरे पाणीपुरवठा अभियंता, अक्षय चौधरी सहाय्यक कर निरीक्षक, अजिंक्य शिंपी (पी एम ए वाय). उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने