*चोपडा महाविद्यालयात जागतिक वसुंधरा दिन उत्साहात साजरा.*
चोपडा दि.२२(प्रतिनिधी):महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील भूगोलशास्त्र विभागातर्फे आज दिनांक २२ एप्रिल रोजी जागतिक वसुंधरा दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विभाग प्रमुख व उपप्राचार्य एन.एस.कोल्हे, उपप्राचार्य डॉ. के.एन.सोनवणे, डॉ. शैलेश वाघ व सहकारी उपस्थित होते.
डॉ.शैलेश वाघ यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून जागतिक वसुंधरा दिन साजरा करण्याचा उद्देश विद्यार्थ्यां समोर मांडला. तसेच ज्या पृथ्वी वर साजिवांचा प्रत्येक क्षण, अस्तित्व टिकून आहे त्या वसुंधरेचा दिन साजरा करावा लागण हि एक दुरगामी विचार करण्यास भाग पाडणारी गोष्ट आहे. केवळ वसुंधरा दिन साजरा करुन मानवाने सोपस्कार पार पाडण्यापेक्षा या वसुंधरेवर भूतकाळात घडलेल्या घटना, वर्तमान स्थितीत वसुंधरेवर पडलेला सर्वसमावेशक अतिरिक्त ताण आणि त्यानिमित्ताने या वसुंधरेच्या सोबतच मानवाच्या भवितव्यावर घोंघावत असलेले वादळ यांचे यथावलोकन करुन या वसुंधरेची शाश्वतता टिकवून ठेवण्यासाठी शर्थीने प्रयत्न करणे, हेच खरे वसुंधरा दिन साजरा करण्याचे सार्थक ठरेल या शब्दात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी झाडे लावणे,जल संवर्धन व पर्यावरण पुरक उपक्रमांमध्ये वैयक्तिक व सार्वजनिक स्तरावर मोठ्या प्रमाणात सहभागी झाले पाहिजे व समाजाला कृतीतुन संदेश दिला पाहिजे असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.एन.एस.कोल्हे यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज करतांना अर्थ डे चा उल्लेख अलर्ट डे या शब्दात केला. वसुंधरा दिन साजरा करतांना वसुंधरेला व त्यावरील सजीवांना निर्माण झालेल्या धोक्याची घंटा दुर्लक्षित करता कामा नये, अन्यथा वसुंधरेसोबत सजीवांच अस्तित्व अबाधित राहण अशक्यप्राय आहे. म्हणून वसुंधरा दिन साजरा करतांना वेळोवळी समाजाने विशेषतः विद्यार्थ्यांनी वसुंधरा संवर्धनासाठी सजग राहुन पृथ्वीवर शाश्वत सजीव सृष्टी टिकवून ठेवण्यासाठी मोलाचे योगदान दिले पाहिजे. तरच घेतलेल्या ज्ञानाचा उपयोग वसुंधरेप्रती असलेली बांधिलकी जपण्यासाठी झाला, असे म्हणता येईल या शब्दात विद्यार्थ्यांचे उद्बोधन केले.
सदर कार्यक्रमासाठी डॉ. आर.आर.पाटील, प्रा. मुकेश पाटील, प्रा. डि.पी.सोनवणे, सौ.संगिता पाटील, श्री.मोतीराम पावरा यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.