तंत्राने शेती केल्यास शेतकर्‍यांचे वैभवाचे दिवस दूर नाहीत : दादा लाड..



 तंत्राने शेती केल्यास शेतकर्‍यांचे वैभवाचे दिवस दूर नाहीत : दादा लाड..

♦️कापूस उत्पादनातील मोठा अडसर गळफांदी काढून टाकण्याचे शेतकर्‍यांना आवाहन  ..

♦️वाघळीत भारतीय किसान संघाच्या कापूूस परिषदेत शेतकर्‍यांनी जाणून घेतल्या उत्पादनवाढीच्या क्ल्तृप्त्या 


चाळीसगाव, २२ एप्रिल(प्रतिनिधी):

गळफांदी कापूस उत्पादक शेतकर्‍यांच्या उत्पादनातील मोठा अडसर असल्याचे सांगत शेतकर्‍यांनी पारंपारिक पध्दत टाळून फळफांदीला अन्न रस पुर्णपणे मिळण्याची  व्यवस्था करावी, जेणेकरून उत्पादनात कमालीची वाढ होऊन शेतकरी आर्थिक दृष्ट्या वैभवशाली होण्यास मदत होईल, तंत्राने शेती केल्यास शेतकर्‍यांचे वैभवाचे दिवस दूर नाहीत, असे प्रतिपादन भारतीय किसान संघाचे महाराष्ट्र व गोवा प्रातांचे संघटन मंत्री दादा लाड यांनी केले. ते चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथे विजय रसवंतीगृह येथे गुरूवारी आयोजित कापूस परिषदेत शेतकर्‍यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते. 

 ते पुढे म्हणाले की, कापसाची गळफांदी ३५ दिवसांत काढून टाकावी, त्यामुळे कपाशीच्या फळफांदीला पुर्णपणे अन्नरस मिळून कापसाच्या बोंडाचे वजनात वाढ होईल. बोंडाचे वजन वाढल्यास कापसाचे वजनात आपोआपच वाढ दिसून येईल. त्यासाठी कापसाची गळफांदी कट करणे हा महत्वाचा उत्पन्न वाढीचा मुद्दा असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. गळफांदी ही मूळ झाडाच्या खोडाबरोबर स्पर्धा करीत असते. त्यामुळे ती काढल्यास मुळ झाड जोमाने वाढते अन् फळफांदीला संपुर्ण पोषण मिळते. तसेच कापसाची उंची साडे तीन फुटापेक्षा जास्त ठेवू नका. कापसाची उंची जास्त वाटत असेल तर चार बोटांचा शेंडा त्यांचा खोडून टाकण्याचे आवाहन दादा लाड यांनी यावेळी शेतकर्‍यांना केले. तसेच कापूस लागवडीसाठी ठिंबक सिंचन व मल्चिंग पेपरचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले. 

 कापूस परिषदेला भारतीय किसान संघाचे जिल्हा प्रचारप्रमुख रामदास माळी, तालुकाध्यक्ष विकास चौधरी, वाघळी दुध उत्पादक सोसायटीचे चेअरमन चंद्रकांत भोळे, ऍड. मधुमामा बर्‍हाटे, वाघळी दुध उत्पादक सोसायटीचे माजी चेअरमन अर्जून माळी, विकास सोसायटीचे सदस्य दादाभाऊ महाजन, भास्कर बेडिस्कर, ह.भ.प.संदीप महाराज, भिकन महाजन, अशोक महाजन, अभिमन्यू महाजन, राजेंद्र महाजन दस्केबर्डी, सोपान माळी बहाळ, निलेश महाजन, नाना पाटील सार्वे, अनिल बोरसे, आनंदा महाजन,  निलेश सोनगिरे, डॉ.राजेद्र पवार, संजय चौधरी, हिलाल भोई, गणेश भोई, अमोल माळी, अविनाश माळी, राहूल माळी, मयूर माळी, समाधान महिरे, अशोक भोळे, दिलीप भोई, आनंदा जाधव हिंगोणे खुर्द, सुरेश पाटील मुंदखेडा, डॉ.रवींद्र मराठे तरवाडे, दिनानाथ पाटील आमडदे, राजेंद्र बुडगुजर पिंपळगाव हरेश्‍वर, पृथ्वीराज पाटील कजगाव पिंप्री, योगेश अमृतकर कजगाव, तुषार पाटील अमळनेर, संतोष खैरनार बनोटी, सुरेश पाटील पाचोरा, हरीष घडमोडे अंधारी, नाना पाटील सार्वे, रवींद्र देशमुख बांबरुड, मुरलीधर पाटील अंजनविहिरे, गोपाळ शिंदे पिंपळगाव हरेश्‍वर, नारायण परदेशी आदी शेतकरी बांधव उपस्थित होते. 

अशी करा कापसाची लागवड 

 कापसाच्या लागवडीबाबत माहिती देतांना दादा लाड म्हणाले की, ३ बाय २ फूट किंवा २ बाय १ फुटावर करावी. तीन बाय २ फुटावर लागवड केल्यास एकरात १४ हजार कपाशीची झाडे लागवड करता येणे शक्य आहे. तसेच कापसाची साधारण या पध्दतीने लागवड केल्यास एका बोंडाचे वजन ५ ते ६ ग्रॅम भरले. ३५ बोंड साधारणपणे एका झाडाच्या माध्यमातून मिळाल्यास पाच ग्रॅम प्रमाणे ३५ बोंडाचे वजन १५० ते १७५ ग्रँम येईल. १४ हजार कापसाच्या झाडाव्दारे १५० ग्रॅम प्रती झाडप्रमाणे २१ ते २२ क्विंटल उत्पादन सहज घेता येणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. त्यात गळफांदी कट करणे, मल्चिंग पेपरचा वापर केल्यास कापसच्या पांढर्‍या मुळ्या जोमाने वाढवून उत्पादनात दुप्पट वाढ करतात. त्यामुळे कापसाचे एकरी ३५ ते ४० क्विंटल उत्पादन शेतकर्‍यांना तंत्राने शेती केल्यास सहजपणे घेता येऊ शकते. त्यासाठी त्यांनी शेतकर्‍यांना उत्पादनवाढीच्या वेगवेगळ्या क्लृप्त्या सांगितल्या. तसेच कापसाची लागवड करतांना शेतकरी एका ठिकाणी दोन बिया टाकतात. या पध्दतीने दोन बियाच्या लागवडीमुळे एका झाडाला पुर्ण पोषण मिळत नाही. उत्पादनावर त्यांचा परिणाम होत असल्याचे त्यांनी म्हटले. उगवलेल्या कोंबावर मृगाचा पाऊस पडल्यास उत्पादन वाढीस मदत होत आहे. 

  उत्पादन खर्च कमी करा 

शेतकर्‍यांनी कापसाचे उत्पादन घेता त्यावरील खर्च कमी करण्याची गरज आहे. गरज नसतांना दिल्या जाणार्‍या रासायनिक खतांमुळे उत्पादन खर्च वाढतो. झाडाची वाढ करण्यासाठी गरज नसतांनाही युरियाची मात्रा शेतकरी कपाशी पीकाला मोठ्या प्रमाणात देतात. तसेच ४० दिवसाच्या अंतराने खते दिले गेली पािंंहजे. युरीयाचा वापर कमीत कमी वापर करावा. अकारण व अज्ञानापोटी शेतकर्‍यांकडून युरियाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दाद लाड यांनी सांगितले. सुर्यप्रकाश हे झाडाचे सर्वात महत्वाचे खत आहे. शेतीसह बांधावरील उत्पन्नही शेतकर्‍यांनी वाढविण्याची गरज असल्याचे सांगत कापसाचे योग्य पध्दतीने तंत्राचा अवलंब करून उत्पादन घेतल्यास शेतकर्‍यांसाठी ते मोठे वरदान ठरणार असल्याचे दाद लाड यांनी सांगितलेे.

ज्वारी तंत्रावर प्रयोग 

ज्वारीचे उत्पादन शेतकर्‍यांना एकरी ३५ ते ४० क्विंटल होऊ शकते. त्यासाठी ज्वारी तंत्रावर सध्यास्थितीती प्रयोग सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तणनाशक म्हणून देशी गायींचे गोमूूत्र वापरण्याचे आवाहन त्यांनी  केलेे. रासायनिक खताचा वापर कमी केल्यास कुठलेही पीक घेण्यासाठी जमीन पहेवालन होते. त्यासाठी रासायनिक खतांचा वापर कमी करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने