गिम्हवणे मराठी शाळा आजपासून गजबजली
रत्नागिरी दि.०४(प्रतिनिधी सुशीलकुमार पावरा):कोरोना महामारीमुळे गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद होत्या. शासनाच्या आदेशानुसार आज 4 ऑक्टोबर पासून ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंत व शहरी भागात इयत्ता आठवी ते बारावी पर्यंत वर्ग सुरू झाले आहेत. दापोली तालुक्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषद आदर्श केन्द्रशाळा गिम्हवणे या मराठी शाळेची आज शाळेची घंटा वाजली आहे.शाळेत विद्यार्थी आल्यामुळे शाळा गजबजली आहे.
कोरोना नंतर आजपासून शाळा सुरू झाल्यामुळे विद्यार्थी, मुख्याध्यापक शिक्षक व पालक यांना आनंद झालेला आहे.गेली दीड वर्षे आम्ही विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन संपर्कात होतो.आजपासून विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संपर्कात येत आहोत त्यामुळे ख-या अर्थाने विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाला सुरवात होणार आहे. विद्यार्थ्यांचा अभ्यास तपासायला व त्यांची चूक लक्षात आणून द्यायला आता सोपे जाईल. विद्यार्थ्यांना शाळेत 1 तास जरी प्रत्यक्षात शिकवलं तरी ते विद्यार्थ्यांना चांगले लक्षात राहते.अशी प्रतिक्रिया गिम्हवणे मराठी शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री. सदाशिव रसाळ यांनी दिली आहे.
विद्यार्थ्याविना म्हणजे पाखरांविना शाळा इतके दिवस सुनी सुनी वाटत होती.आज शाळेत विद्यार्थी म्हणजे पाखरे आल्यामुळे आमची शाळा गजबजली आहे. आज आम्ही विद्यार्थ्यांना गाणी गोष्टी सांगून व मनोरंजनात्मक खेळ खेळवून मनोरंजन करणार आहेत. मुलांना शाळेत रमवून घेणार आहोत,असे शाळेच्या शिक्षिका श्रीम. आलीशान अहिरे म्हणाल्या.माझ्या समोर एक मोठी समस्या होती ती म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षा व नवोदय परीक्षा. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिकवल्याशिवाय समजणं अवघड होतं ,दरवर्षी आमच्या शाळेतील मुलं मेरीटमध्ये येतात,त्यांना प्रत्यक्षात घरी जाऊन अध्यापन करायला आम्हाला जमत नव्हतं कारण गावात कोरोना पेशंट होते.मात्र आज पासून शाळा सुरू झाल्यामुळे आम्हाला विद्यार्थ्यांना जादा वेळ देता येईल,अभ्यास सोडवून घेता येईल,त्यांची प्रगती साधून घेता येईल.विद्यार्थी शाळेत जास्तीत जास्त कसे येतील याकडे शिक्षक म्हणून आम्ही लक्ष देऊ असे शाळेतील शिक्षिका सौ.मुग्धा सरदेसाई यांनी सांगितले. त्याचबरोबर गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद होत्या तरी आम्हा शिक्षकांना शाळेत यावं लागतं होत. शाळेत मुलं येत नसल्याने शाळेत भकास वाटत होतं.मात्र आजपासून शाळा सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांपेक्षा आम्हाला अधिक आनंद झाला आहे. इतके दिवस आम्ही विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देत होतो.त्यांच्या शंका निरसन करायला अडचण येत होती.ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल होते त्यांचा अभ्यास होत होता आणि ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल नव्हता त्यांचा अभ्यास मागे राहत होता. काही विद्यार्थ्यांच्या पालकांकडे मोबाईल घेण्याची कुवत नसल्यामुळे ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहावे लागत होते. आजपासून प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना शिकवता येईल याचा खूप आनंद होत आहे. अशी प्रतिक्रिया पदवीधर शिक्षिका श्रीम. प्रिया पवार यांनी दिली.
आज शाळा सुरू झाल्यामुळे आम्हाला खूप आनंद होत आहे. शाळेत शिक्षकांनी शिकवलं आम्हाला लक्षात राहतं.मोबाईल वरचं शिकवलेले लक्षात राहत नाही. अशी प्रतिक्रिया वैष्षवी जांभळे या विद्यार्थीनींनी दिली.त्याचबरोबर सृष्टी ढवळे,जय किरडवकर या विद्यार्थ्यांनी सुद्धा आम्हाला आज खूप आनंद होत आहे असे मनोगत व्यक्त केले.
गेल्या दोन दिवसांपासून शाळेतील शिक्षक,शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ यांनी शाळेचा परिसर स्वच्छ केला.पालक व ग्रामस्थांचे चांगले सहकार्य लाभले आहे. असे मुख्याध्यापक सदाशिव रसाळ यांनी सांगितले.
शाळा ठीक 10.30 वाजता सुरू झाली.शाळेची सुरवात परिपाठाने झाली. श्लोक म्हणण्यात आले. सांभाळ देवा तुझ्या मुलांना ही प्रार्थना शाळेतील शिक्षिका आलिशान अहिरे यांनी मधूर आवाजात गायली.त्यांच्या पाठोपाठ विद्यार्थ्यांनी सुद्धा प्रार्थना म्हटली.
त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक सदाशिव रसाळ यांच्या हस्ते विद्यार्थी प्रतिनिधी यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. शिवाजी गोरे न्यूज 18 लोकमत रत्नागिरी प्रतिनिधी तथा सामाजिक कार्यकर्ता, सुशीलकुमार पावरा संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स तथा सामाजिक कार्यकर्ता यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती चे पदाधिकारी व शाळेतील मुख्याध्यापक सदाशिव रसाळ,पदवीधर शिक्षिका प्रिया पवार, पदवीधर शिक्षिका सुखदा गोरड,शाळेतील शिक्षिका मुग्धा सरदेसाई,रश्मी शिगवण,निर्मला पारदुले,आलिशान अहिरे इत्यादी शिक्षक वर्ग उपस्थित होते. वर्गात उत्साहात अध्यापनाला सुरवात करण्यात आली. विद्यार्थ्यांनी छान कविता व गाणी म्हटली.दीड वर्षानंतर गिम्हवणे मराठी शाळा आजपासून गजबजलेली पाहायला मिळाली.