चोपडा महाविद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त 'भक्तीगीत गायन' कार्यक्रम उत्साहात संपन्न
चोपडा,दि.२८(प्रतिनिधी): येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील मराठी व संगीत विभागाच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीचे औचित्य साधून 'भक्तीगीत गायन कार्यक्रमाचे' आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड.संदीप सुरेश पाटील हे उपस्थित तर प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा.डॉ.संध्या एम.सोनवणे तसेच उपप्राचार्य व मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.के.एन.सोनवणे, उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.बी.सूर्यवंशी, समन्वयक डॉ.एस.ए.वाघ, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य पी.एस.पाडवी आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थितांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून तसेच श्रीविठ्ठल प्रतिमापूजन आणि तुलसी माल्यार्पणाने करण्यात आली. यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवृत्ती बी. पाटील यांनी केले. यावेळी त्यांनी कार्यक्रमाचा उद्देश व भूमिका विशद केली.
या कार्यक्रमाच्या सुरवातीला'माऊली माऊली रूप तुझे' हे गीत सायली कुंभार, काजल कोळी, नेहा बाविस्कर व महिमा चौधरी, कावेरी सोनगिरे, भाग्यश्री कोळी, वेदांती पाटील, कावेरी चौधरी यांनी सादर केले. वेदांती पाटील हिने 'सावळ्या विठ्ठला', संगीत विभाग प्रमुख किशोर खंडागळे यांनी 'विठू माऊली तू', 'पांडुरंग नामे लागलासी ध्यास' ही सुरेल भक्ती गीते सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली. साक्षी पाटील आणि साक्षी पारधी यांनी 'कन्हैया लागला तुझा रे छंद' तसेच 'यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी' हे गीत आरती पाटील, जान्हवी पाटील, कमलेश महाजन, भाग्यश्री पानपाटील, सुमित पाटील यांनी सादर केले. 'अवघे गर्जे पंढरपुर' हे गीत साक्षी पारधी व शशिकांत कोळी यांनी सादर केले.तथागत शिरसाठ यांनी 'देखोनिया तुझा रूपाचा आकार' अशी अनेक सहभागी गायक विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सुरेल व भावपूर्ण भक्तीगीते सादर करून उपस्थितांना भक्तीरसात मंत्रमुग्ध केले.
यावेळी प्राचार्य डॉ. संध्या एम. सोनवणे यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. अध्यक्षीय भाषणात संस्थेचे अध्यक्ष तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड.संदीप सुरेश पाटील यांनी भक्तिगीत गायन कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. 'कलागुणांना वाव देण्यासाठी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्वाचे कार्यक्रम आयोजित करणे आवश्यक असून भारतीय संस्कृती व भक्ती परंपरेचे महत्त्व आणि त्यामागील वैज्ञानिक दृष्टिकोन पटवून सांगणे आवश्यक आहे.' असे सांगत सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन कु. आरती विनोद पाटील व सायली कुंभार हिने केले. कार्यक्रमाच्या शेवटी कु. नेहा लालचंद बाविस्कर हिने उपस्थितांचे आभार मानले. यावेळी इयत्ता १२ वी वाणिज्य वर्गातील विद्यार्थिनी नेहा बाविस्कर, कावेरी सोनगिरे, भाग्यश्री कोळी यांनी सादर केलेल्या 'पसायदानाने' कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.एम.एल.भुसारे, निकिता शर्मा, चेतन बाविस्कर, नितेश पाटील तसेच संगीत विभाग प्रमुख किशोर खंडागळे व विभागातील कलावंत विद्यार्थी समूह यांचे सहकार्य लाभले.
महाविद्यालयातील स्मार्ट हॉलमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थी व शिक्षकांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला असून सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
