चोपडा तालुका कन्वर्जन समितीची बैठक संपन्न
चोपडा दि.१७(प्रतिनिधी )चोपडा तालुका कन्वर्जन समितीची बैठक मा. तहसीलदार तथा तालुका कन्वर्जन समितीचे सह अध्यक्ष श्री. भाऊसाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालय, चोपडा येथे संपन्न झाली.
सदर बैठकीमध्ये चोपडा तालुक्यातील सामूहिक वनहक्क (CFR) मंजूर झालेल्या गावांचे संसाधन व्यवस्थापन आराखडे (Micro Plan/Management Plan) तातडीने तयार करण्याबाबत सविस्तर नियोजन करण्यात आले. चोपडा तालुक्यातील मंजूर गावांपैकी अंमलवाडी या गावाचा आराखडा पूर्ण झालेला असून उर्वरित गावांचे आराखडे लवकरात लवकर तयार करण्याचे नियोजन करण्यात आले.
बैठकीमध्ये तालुका वनहक्क व्यवस्थापक श्री. भूषण कोळी यांनी आराखडा तयार करताना आवश्यक असलेले सर्व टप्पे, ग्रामसभेची भूमिका, वनसंपत्तीचे सर्वेक्षण, उपलब्ध नैसर्गिक संसाधनांचे दस्तऐवजीकरण, गरजांचे प्राधान्यक्रम, विकास आराखडा तयार करण्याची पद्धत तसेच शासनाच्या विविध योजनांची सांगड घालण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
तसेच रोहयो उपजिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशांत सर यांनी VB G RAM G योजनेअंतर्गत सामूहिक वनहक्क क्षेत्रामध्ये जलसंधारण, मृदसंधारण, वृक्षलागवड, वनसंवर्धन, शेत व वनरस्ते, चर, बंधारे, पाणीसाठे, जैवविविधता संवर्धन, नर्सरी तसेच इतर रोजगाराभिमुख विकासकामे मोठ्या प्रमाणात कशी मंजूर करून घ्यावीत आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी कशी करावी याबाबत CFRMC समितीचे अध्यक्ष व सचिव यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
बैठकीस रोहयो उपजिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रशांत सर, एपीओ दाभाडे सर, अशासकीय सदस्य, अडावद, देवझिरी, चोपडा व वैजापूर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी (RFO), नरेगा टीम चोपडा, तालुका वनहक्क व्यवस्थापक, ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या बैठकीत सामूहिक वनहक्क मंजूर गावांचा विकास आराखडा गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण करून VB G RAM G योजनेतून जास्तीत जास्त विकासकामे मंजूर करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
