रानभाजी महोत्सव उत्साहात संपन्न.. आदिवासी परंपरा, आरोग्य व पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संगम

 रानभाजी महोत्सव उत्साहात संपन्न.. आदिवासी परंपरा, आरोग्य व पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संगम

सत्रासेन ,ता. चोपडा (प्रतिनिधी)दि.१६ :धनाजी नाना प्राथमिक तसेच डी.आर.बी. माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, सत्रासेन (ता. चोपडा, जि. जळगाव) येथे विद्यार्थ्यांमध्ये पारंपरिक आहाराविषयी जागरूकता निर्माण करणे, स्थानिक जैवविविधतेचे संवर्धन करणे आणि रानभाज्यांचे पोषणमूल्य समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने "रानभाजी महोत्सव" उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

आदिवासी भागातील विद्यार्थी जंगल व निसर्गाच्या सान्निध्यात वाढत असल्याने त्यांना विविध रानभाज्या, त्यांची ओळख, उपयोग व औषधी गुणधर्म यांचे सखोल ज्ञान आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या पारंपरिक ज्ञानाचा उत्कृष्ट परिचय करून देत विविध रानभाज्यांची माहिती उपस्थितांना दिली. त्यांच्या या ज्ञानामुळे कार्यक्रमाला विशेष वैशिष्ट्य प्राप्त झाले.

या कार्यक्रमासाठी शालेय विभागाचे केंद्रप्रमुख श्री. मोनेश बाविस्कर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्थेचे सचिव श्री. ज्ञानेश्वर भादले यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी माध्यमिक मुख्याध्यापिका सौ. वंदना पावरा, प्राथमिक मुख्याध्यापक श्री. दौलत पावरा तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महोत्सवात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या पौष्टिक, औषधी आणि जैवविविधतेचे प्रतीक असलेल्या रानभाज्यांचे आकर्षक प्रदर्शन भरविले. प्रत्येक रानभाजीची ओळख, पोषणमूल्य, औषधी उपयोग, उपलब्धता तसेच आरोग्यदायी जीवनशैलीतील तिचे महत्त्व याविषयी विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने माहिती सादर केली. याशिवाय रानभाज्यांपासून तयार करण्यात आलेल्या विविध चविष्ट व पौष्टिक पदार्थांचे प्रदर्शन आणि चाखण्याची व्यवस्था करण्यात आली. या उपक्रमाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पारंपरिक आहारपद्धतीचे महत्त्व, स्थानिक अन्नसंपत्तीचे जतन, रासायनिक अन्नपदार्थांऐवजी नैसर्गिक व सकस अन्नाचा स्वीकार, तसेच पर्यावरण संवर्धनाची गरज याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी रानभाज्यांचे संवर्धन करून त्यांचा दैनंदिन आहारात समावेश करण्याचा संकल्प व्यक्त केला.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम, पर्यावरण संरक्षणाची भावना, आरोग्यदायी जीवनशैलीची जाणीव आणि आपल्या आदिवासी संस्कृती व पारंपरिक ज्ञानाबद्दल अभिमान निर्माण झाला. उपस्थित पालक व मान्यवरांनी या अभिनव उपक्रमाचे मनापासून कौतुक करून विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. मनोज पाटील, श्री. गजानन पाटील, श्री. योगेश पाटील, श्री. नरेंद्र देसले, श्री. झेड. एच. करकाळे, श्री. कैलास महाजन, श्री. संजय शिरसाळे, श्री. अधिक भादले, श्री. विकास पाटील, सौ. वैशाली अजगे, श्री. सुधाकर महाजन, श्री. योगेश गांगुर्डे, श्री. गणेश शिंदे व श्री. नरेंद्र महाजन यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन श्री. भालचंद्र शिवाजी पवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. अजय पावरा यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने