मोरेश्वर हॉस्पिटलात आयुष्मान योजनेद्वारे मोफत व कॅशलेस उपचार : डॉ. सागर पाटील यांची माहिती
चोपडा,दि.८ (प्रतिनिधी)गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मोरेश्वर हॉस्पिटलमध्ये आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तसेच महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या योजनांअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मोफत व कॅशलेस उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
रुग्णालयात योजनेसाठी स्वतंत्र मदत कक्ष सुरू करण्यात आला असून, लाभार्थ्यांना नोंदणी, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, पात्रतेची पडताळणी आणि उपचार प्रक्रियेबाबत संपूर्ण मार्गदर्शन केले जात आहे. त्यामुळे गरजू रुग्णांना कोणताही त्रास न होता योजनांचा लाभ मिळत आहे.
मोरेश्वर हॉस्पिटलचे संचालक डॉ. सागर पाटील यांनी सांगितले की, "शासनाच्या या महत्त्वपूर्ण आरोग्य योजनांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा. आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही गरजू व्यक्तीने उपचारांपासून वंचित राहू नये, हा आमचा प्रयत्न आहे. हॉस्पिटलमध्ये २४ तास वैद्यकीय सेवा उपलब्ध असून गरजू व गरीब रुग्णांना आवश्यक ते सहकार्य करण्यात येत आहे."
यावेळी नागरिकांना आपल्या परिसरातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत या योजनांची माहिती पोहोचविण्याचे आवाहनही करण्यात आले. शासनाच्या या लोकहितकारी योजनांचा लाभ घेऊन आर्थिक भार कमी करावा आणि वेळेत उपचार करून घ्यावेत, असे आवाहन डॉ. सागर पाटील यांनी केले.
