चोपडा येथील प्रा. संजय नेवे 'नासा इंडिया' अधिवेशनासाठी निमंत्रित

 चोपडा येथील प्रा. संजय नेवे 'नासा इंडिया' अधिवेशनासाठी निमंत्रित


चोपडादि.२६(प्रतिनिधी) - येथील भगिनी मंडळ संचालित ललित कला केंद्रातील प्रा. संजय मनोहर नेवे यांची केरळ मधील एरनाड नॉलेज सिटी (मंजेरी) येथे होणाऱ्या 'नासा इंडिया' या संस्थेच्या वार्षिक अधिवेशनासाठी निवड झाली असून त्यांना या अधिवेशनासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

नासा (नॅशनल असोसिशन ऑफ स्टुडंट्स ऑफ आर्किेटेक्चर) ही आर्किटेक्चर शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची जगातील सर्वात मोठी संघटना असून ७० हजार पेक्षा अधिक विद्यार्थी यात सदस्य असून ते जगभरातील ३२० महाविद्यालयातून शिक्षण घेत आहेत. या संघटनेच्या २९ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान केरळ मधील एरनाड नॉलेज सिटी येथे होणाऱ्या ६६ व्या वार्षिक अधिवेशनासाठी कला प्रकारातील मार्गदर्शक म्हणून प्रा. संजय नेवे यांची निवड करण्यात आली. या अधिवेशनात दक्षिण आशियाई (सार्क) ८ देशांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती असणार आहे. या अधिवेशनात कि नोट्स स्पीच, मास्टर क्लासेस, सेमिनार, पॅनल डिस्कशन, वर्कशॉप, ट्रॉफी व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. यात आर्किटेक्चर, कला, डिझाईन, हस्तकला, वक्तृत्व, चित्र अशा विविध क्षेत्रातील जगभरातील ३६ ट्यूटर (मार्गदर्शक) आमंत्रित केले गेले आहेत. यातील कला विभागासाठी प्रा. संजय नेवे यांना निमंत्रित करण्यात आले असून ते नेचरहूड लँडस्केप व सिटीस्केपचे प्रात्यक्षिक या कालावधीत तेथे करणार आहेत. तसेच निसर्ग चित्रण म्हणजे काय, त्याची उपयुक्तता, प्रकार, संकल्पना, वैशिष्ट्ये, इतिहास, फायदे, तंत्र अशा विविध मुद्द्यांवर स्लाईड शो, प्रात्यक्षिक याद्वारे मार्गदर्शन करणार आहेत.

त्यांच्या या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रा. अरुणभाई गुजराथी, भगिनी मंडळ संस्थेच्या अध्यक्ष पूनम गुजराथी, सहसचिव अश्विनी गुजराथी, समाजकार्य महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. आशिष गुजराथी यांच्यासह संस्थेतील विविध विभाग प्रमुख व सहकारी शिक्षक तथा विद्यार्थ्यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने