बोगस डॉक्टर गजाआड, ॲलोपॅथिक औषधे व वैद्यकीय साहित्य जप्त
अडावद,ता.चोपडा (प्रतिनिधी): कोणतीही वैद्यकीय पदवी अथवा नोंदणी नसताना वटार (ता. चोपडा) येथे बेकायदेशीरपणे वैद्यकीय सराव करणाऱ्या एका बोगस डॉक्टरवर अडावद पोलिसांनी आरोग्य विभागाच्या मदतीने धाड टाकून कारवाई केली आहे. या कारवाईत आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात ॲलोपॅथिक औषधे व वैद्यकीय साहित्य जप्त करण्यात आले आहे.
घटना व कारवाईचा तपशील:
अडावद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंदारे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, वटार गावामध्ये एक इसम कोणतीही अधिकृत वैद्यकीय पदवी नसताना बोगस डॉक्टर बनून ग्रामस्थांच्या जिवाशी खेळत आहे. या माहितीच्या आधारे आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम पाटील (प्रा. आ. केंद्र अडावद) आणि डॉ. दिनेश चौधरी (समुदाय आरोग्य अधिकारी, मंगरुळ) यांनी अडावद पोलिसांच्या पथकासह (पोलीस उपनिरीक्षक सचिन नागरे, पो.ह. भरत नाईक, पो.ह. संजय धनगर, पो.ह. शेषराव तोरे, पो.ह. किरण शिरसाठ व पंच) दि. १० ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १:०० वाजेच्या सुमारास वटार येथील संशयिताच्या ठिकाणी छापा टाकला.
छाप्यादरम्यान आरोपी अरुपकुमार अजय कुमार आढळ (वय ४१, मूळ रा. २४ परगना, पश्चिम बंगाल; सध्या रा. वटार, ता. चोपडा) हा रुग्णांवर उपचार करताना मिळून आला. त्याच्याकडे वैद्यकीय व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या 'महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल'च्या नोंदणी प्रमाणपत्राची मागणी केली असता, त्याने भिंतीवर लावलेली 'Vital Council of Vocational and Research Training' व 'Nikhil Bangiya Vidyapeeth' यांची अमान्य प्रमाणपत्रे दाखवली.
औषध व साहित्याची जप्ती:
कारवाईदरम्यान त्याच्या ताब्यातून स्टेथॉस्कोप, विविध प्रकारची ॲलोपॅथिक औषधे, इंजेक्शन्स (C-One, Gentamicin, Dexamethasone, Ranitidine इ.), सलाईन (NS 500ml), सीरेंज व इतर वैद्यकीय साहित्य जप्त करून सील करण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांची दिशाभूल करून त्यांच्या जिवाशी खेळणाऱ्या व स्वतःच्या आर्थिक लाभासाठी बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या अरुपकुमार आढळ याच्याविरुद्ध डॉ. शुभम पाटील यांच्या फिर्यादीवरून अडावद पोलीस ठाण्यात महाराष्ट्र वैद्यकीय व्यावसायिक अधिनियम, १९६१ चे कलम ३३ अन्वये गुन्हा (गु.र.क्र. १६०/२०२६) दाखल करण्यात आला आहे.सदर प्रकरणाचा पुढील तपास पो.ह. संजय धनगर हे करीत आहेत.
