ललित कला केंद्र चोपडाचा शंभर टक्के निकाल; ए.टी.डी. द्वितीय वर्षात विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
चोपडा,दि.८( प्रतिनिधी)कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई अंतर्गत महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या कला शिक्षक पदविका (ए.टी.डी.) द्वितीय वर्ष (उच्चकला) परीक्षेचा निकाल ७ जुलै २०२६ रोजी जाहीर झाला. या परीक्षेत भगिनी मंडळ, चोपडा संचलित अनुदानित ललित कला केंद्र, चोपडा येथील विद्यार्थ्यांनी शंभर टक्के निकालाची गौरवशाली परंपरा कायम राखत उल्लेखनीय यश संपादन केले.या परीक्षेत कु. देवांशी पित्रोडा (धरणगाव), कु. राजनंदिनी पाटील (चोपडा), कु. सुरेखा पवार (निगदी, जि. नंदुरबार) आणि सिद्धेश पाटील (विखरण, जि. नंदुरबार) यांनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत संस्थेच्या गुणवत्तेचा ठसा उमटविला. विशेष म्हणजे, पहिल्या तीन गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये मुलींनी मानाचे स्थान पटकावत यशाची बाजी मारली. तसेच इतर सर्व विद्यार्थ्यांनीही द्वितीय श्रेणीत यश मिळवत संस्थेचा शंभर टक्के निकाल कायम राखला.
विद्यार्थ्यांच्या या यशामुळे संस्थेची शैक्षणिक गुणवत्ता आणि कला शिक्षणातील उत्कृष्ट परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून, ललित कला केंद्राच्या नावात आणखी भर पडली आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा सौ. पूनमताई गुजराथी, सहसचिव अश्विनीताई गुजराथी, समन्वयक डॉ. आशिष गुजराथी, प्राचार्य सुनील बारी, तसेच सेवानिवृत्त प्राध्यापक प्रा. विनोद पाटील, प्रा. संजय नेवे, श्री. भगवान बारी, श्री. अतुल अडावदकर, श्री. प्रवीण मानकरी आणि प्राध्यापक व कर्मचारीवृंद यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
प्रवेशासाठी आवाहन
चालू शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी कला शिक्षक पदविका (ए.टी.डी.), फाउंडेशन इन आर्ट अँड डिझाइन तसेच रेखा व रंगकला (जी.डी. आर्ट – पेंटिंग) अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी ११ जुलै २०२६ पूर्वी प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
