फुले-आंबेडकरांनी पेरलेले विचार अंगिकारावे..प्राचार्या प्रा. डॉ. संध्या एम.सोनवणे
चोपडा दि.१६(प्रतिनिधी)'महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव' ची सांगता दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील कनिष्ठ महाविद्यालयात करण्यात आली. कार्यक्रमाची सुरवात ११ वी कला चा विद्यार्थी शिवम गुरव याने बासुरी वाजवून केली. यानंतर मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमास प्राचार्या प्रा. डॉ. संध्या एम. सोनवणे, उपप्राचार्य डॉ. के. एन. सोनवणे, प्रमुख वक्ते प्रा. एल. एम. भुसारे, कनिष्ठ महाविद्यालयातील उपप्राचार्य पी. एस. पाडवी व पर्यवेक्षक ए. एन. बोरसे विचार मंचावर उपस्थित होते.
विद्यार्थी मनोगतात विद्यार्थ्यांनी फुले व आंबेडकर यांच्या कार्यावर विविधांगी भाष्य केले. त्यांच्या कार्याचा उजाळा विद्यार्थी आपल्या भाषणातून देत होते. शिक्षक मनोगतात पर्यवेक्षक ए. एन. बोरसे यांनी आपले विचार व्यक्त करून महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक जीवन व शैक्षणिक कार्यावर प्रकाश टाकला. या कार्यक्रम प्रसंगी समन्वयक पी. एस. पाडवी यांनी कार्यक्रम साजरा करण्याचा उद्देश स्पष्ट केला, फुले व आंबेडकर यांचे कार्य समता व न्यायवादी असून त्याचा फायदा आजच्या पिढीला होत आहे असे मत त्यांनी व्यक्त
केले. प्रमुख वक्ते यांनी फुले व आंबेडकर फक्त एका जाती पुरते मर्यादित नसून सर्वांसाठी त्यांनी कार्य केले आहे असे स्पष्ट केले. उपप्राचार्य डॉ. के. एन. सोनवणे यांनी फुलेंचे शेतीविषयक व आंबेडकरांचे संविधान विषयक मूल्य यावर आपले विचार व्यक्त केलेत.
अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयच्या प्राचार्या प्रा. डॉ. संध्या एम. सोनवणे यांनी महात्मा फुलेंचे विचार सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक इत्यादि घटकांमध्ये किती महत्वपूर्ण आहेत; असे आपल्या भाषणातून पटवून दिले. सर्वच समाज सुधारकांनी जे विचार पेरेलेले आहेत ते आंगीकारावे. स्वातंत्र्य, समता व बंधुभाव प्रस्थापित होण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न व्हावेत. जयंती नाचून नव्हे तर वाचून साजरी करायला हवी. फुले व आंबेडकरांनी महिला शिक्षणावर अधिक भर दिल आहे. फुलेंनी महिलांना शिक्षण दिले तर आंबेडकरांनी संविधानाद्वारे महिलांना स्वातंत्र्य बहाल केले. अशा विविध मुद्यांवर प्राचार्या यांनी माहिती दिली.
महाराष्ट्रातील समाज सुधारकांवर आधारित 'सामान्य ज्ञान स्पर्धेचे' बक्षीस वितरण करण्यात आले. दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी 'सामान्य ज्ञान स्पर्धेचे' आयोजन करण्यात आले होते. हि स्पर्धा घेण्यापूर्वी 10 दिवस आधी महाराष्ट्रातील 50 समाज सुधारकांची पीडीएफ पुस्तिका विद्यार्थ्यांना त्यांच्या WhatsApp ग्रुपवर टाकण्यात आली. ह्या पुस्तिकेच्या आधारे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक कौशल्य वाढावे, विविध स्पर्धांची माहिती व्हावी आणि सामाजिक क्षेत्रातील सर्वांगीण विकास व्हावा तसेच विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी ह्या उद्देशाने स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचे स्वरूप बहुपर्यायी प्रकारचे होते. एकूण प्रश्न 50 असून प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क होते. परीक्षेसाठी वेळ मर्यादा 1 तासाची निश्चित करण्यात आली. स्वतंत्र प्रश्नपत्रिका व स्वतंत्र उत्तर पत्रिका देण्यात आली. अशी 100 गुणांची परीक्षा घेण्यात आली. ह्या परीक्षेत महाविद्यालयातील एकूण 210 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. ह्या स्पर्धेत शिवम अनंत गुरव प्रथम, शिवराज संतोष भोई-द्वितीय, अश्विनी महेंद्र कोळी व शेख फैजल शेख हाफीज तृतीय क्रमांकाने गौरवण्यात आले. ७ विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाणिज्य विभागातील विद्यार्थीनी कु. सायली कुंभार हिने केले. सदर कार्यक्रमास कनिष्ठ विभागातील कला व वाणिज्य विभागातील सर्व शिक्षकवृंद यांचे अनमोल सहकार्य लाभले. कार्यक्रमास शिक्षकेतर कर्मचारी यांचे देखील सहकार्य लाभले. इयत्ता 11 वी वर्गाची विद्यार्थिनी कु. भाग्यश्री कोळी हिने कार्यक्रमाच्या उपस्थितांचे आभार मानलेत.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एस. टी. शिंदे, संदीप पाटील, प्रमोद. आर. पाटील, भूषण बिरारी, संदीप देवरे, व्ही. डी. शिंदे, दिपक करणकाळ, निवृत्ती पाटील, श्रीमती. अनीता सांगोरे , बाबासाहेब जाधव, दिनेश अलाम इत्यादि शिक्षकांनी सहकार्य केले व परिश्रम घेतले. संयुक्त जयंती महोत्सवासाठी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
