" केळी "पिक विमा घोटाळ्यातील खरे सूत्रधार व विमा कंपनीची देखील सखोल चौकशी व्हावी.. शेतकरी कृती समिती ची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
चोपडा दि.१०(प्रतिनिधी)केळी पीकविमा योजनेत शेतकरीच घोटाळे करत आहेत असे चित्र उभे केले जात असून वास्तवात पीकविमा कंपन्यांना १५ दिवस कागदपत्रे, स्वीकृतीसाठी ७दिवस वअस्वीकृत प्रस्ताव दुरुस्तीसह मंजुरीकरिता ६०दिवस दिलेले असतात.मग विमा कंपन्यां प्रस्ताव मंजूर कोणत्या आधारे करतात? असा प्रश्न करीत या योजनेत एकूण लाभार्थी रकमेतील सगळ्यात मोठा नफा हा त्यांना होणार असतो तरी देखील एकटा शेतकरीच दोषी का?यात कंपनी व खरे सुत्रधार शोधून सर्वच दोषींवर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी कृती समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
तसेच गेल्या काही वर्षात पैसे घेऊन विमा मंजूर झाल्याचे देखील वृत्त आहेत,त्यांनी शेतकऱ्यांना जाळ्यात ओढून आमिष दाखवून कागदपत्रे घेतले असण्याची देखील शक्यता आहे.
लाखो रुपये पगार असणारे भ्रष्ट्राचार करत असतात ,त्यामुळे गरीब शेतकरी त्यांच्या जाळ्यात अलगदपणे अडकले असावेत अर्थात तेही चूकीचेच त्याचं समर्थन कृती समिती करीत नाही,असे स्पष्ट करीत खरे गुन्हेगार सोडून जे अडकले त्यांना व प्रामाणिक शेतकऱ्यांवर दोषी ठरवू नये असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
तसेच द्राक्ष,डाळिंब वर्षात एकदाच येतात मात्र मृग व आंबिया दोघेही बहारात त्याचा विमा निघतो. मात्र वर्षभर लागवड होणाऱ्या केळी पीकविमा फक्त एकदाच का? का सरकारलाच ही योजना बंद करावयाची आहे ?अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली.
अचानक २८००० शेतकरी कसे वाढले?गुन्हा घडत असताना साऱ्यांना दिसत असताना तो रोखणे बाबत कुणीच का लक्ष दिले नाही?कायदे हे समाज हितासाठी असतात परंतु ईमानदार लोकांना कुणी संशयाने बघितले तरी त्यांना मेल्यासारखे होते.आज साऱ्याच निरापराध शेतकऱ्यांकडेही तसे बघितल जात असल्याने,पारदर्शी तपास होऊन असे घडणार नाही यासाठी योजनेत दुरुस्ती व्हावी अशी विनंती देखील शेतकरी कृती समिती जिल्हाधिकारी यांच्याकडे केल्याची माहिती शेतकरी कृती समितीचे समन्वयक एस बी पाटील व प्रगतीशील शेतकरी भागवत महाजन यांनी दिली आहे.
