पंकज विद्यालयात "केळी"फळा विषयी मार्गदर्शन
चोपडा,दि.१०(प्रतिनिधी)– आरोग्य, पोषण आणि शेतीविषयक जाणीव रुजविणारा एक सुंदर उपक्रम म्हणून पंकज विद्यालयाच्या प्राथमिक विभागात “15 एप्रिल केळी दिन” निमित्ताने जागतिक केळी दिवस आयोजित समिती तर्फे जनजागृती करण्यात आली. “केळी खा – निरोगी राहा” हा संदेश देत विद्यार्थ्यांना केळी व इतर फळांमधील पौष्टिक तत्वांची समृद्ध माहिती देण्यात आली.
या प्रसंगी “बहुगुणी केळी” या विषयावर मार्गदर्शन करताना प्रगतीशील शेतकरी डॉ रविंद्र निकम यांनी केळीचे आरोग्यदायी फायदे, त्यातील जीवनसत्त्वे, पोटॅशियम व ऊर्जा देणारे घटक यांचे महत्त्व अत्यंत प्रभावीपणे मांडले. त्याचप्रमाणे विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश बोरोले यांनी विद्यार्थ्यांना संतुलित आहाराचे महत्त्व पटवून देत, दैनंदिन जीवनात फळांचा समावेश करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमा दरम्यान विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून आपली जिज्ञासा व्यक्त केली. या संवादातून विद्यार्थ्यांचे ज्ञान अधिक दृढ झाले. तसेच विद्यार्थ्यांना पोषणविषयक माहितीपत्रकांचे वितरण करण्यात आले.
या उपक्रमाला आणखी गोडी लाभली ती म्हणजे मध्यान्ह भोजन अंतर्गत आडगाव येथील प्रगत शेतकरी अंबादास पाटील यांच्या तर्फे सर्व विद्यार्थ्यांना केळीचे वाटप करण्यात आले. या उदार उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.
यावेळी शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष एस. बी. पाटील यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांनी विद्यार्थ्यांना पालकांना बाजारातून नियमित केळी खरेदी करण्यास सांगावे व निरोगी जीवन जगावे.असे शेतीचे महत्त्व पटवून देत स्थानिक पिकांना प्राधान्य देण्याचा संदेश दिला.
कार्यक्रमात शाळेतील मुख्याध्यापक एम व्ही पाटील, शेतकरी अजय पाटील,शिक्षक व प्राथमिक, पंकज इंग्लिश स्कूल विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. शिक्षकांनी या उपक्रमाचे नियोजन सुयोग्यरीत्या पार पाडत विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण केली. सुत्र संचलन राजेंद्र पाटील यांनी केले.
अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यदायी सवयी, पोषणाची जाणीव आणि शेतीप्रेम वृद्धिंगत होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. विद्यार्थी मित्रांना रोख बक्षीस देऊन कौतुक केले.
