पंकज माध्यमिक विद्यालयात 'जागतिक वन दिन' उत्साहात साजरा; जंगल संवर्धनाचे आवाहन
चोपडा,दि.२२ (प्रतिनिधी):येथील पंकज माध्यमिक विद्यालयात २१ मार्च रोजी 'जागतिक वन दिना'चे औचित्य साधून जंगल संवर्धन आणि पर्यावरण रक्षणाचा जागर करण्यात आला. वाढते प्रदूषण आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर वृक्षांचे महत्त्व पटवून देण्यासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले वनपाल तुषार देवरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "जंगले ही पृथ्वीची फुफ्फुसे आहेत. जर आपण आज झाडे लावली आणि जगवली नाहीत, तर भविष्यात आपल्याला मोठ्या संकटांना सामोरे जावे लागेल." त्यांनी वनविभागाच्या विविध योजनांची माहिती देऊन प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन केले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील यांनी आपल्या भाषणात निसर्ग आणि मानवाचे अतूट नाते स्पष्ट केले. "केवळ वृक्षारोपण करून चालणार नाही, तर लावलेले वृक्ष जगवणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे," असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली पाटील यांनी केले.
