प्रताप विद्या मंदिरात खान्देशस्तरीय ९व्या कुमार साहित्य संमेलनाची निवड फेरी उत्साहात संपन्न

 प्रताप विद्या मंदिरात  खान्देशस्तरीय ९व्या कुमार साहित्य संमेलनाची निवड फेरी उत्साहात संपन्न


चोपडा,दि.४(प्रतिनिधी): दिनांक 3 डिसेंबर 2025 रोजी विवेकानंद प्रतिष्ठान जळगाव व चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित प्रताप विद्या मंदिर चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने खान्देश स्तरीय ९ व्या कुमार साहित्य संमेलनाची तालुकास्तरीय निवड फेरी मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाली. कार्यक्रमाची सुरुवात उद्घाटन सत्राने करण्यात आली. 

यावेळी प्रताप विद्या मंदिराचे मुख्याध्यापक श्री. पी. एस. गुजराथी तसेच परीक्षक म्हणून कवी श्री अशोक सोनवणे व वात्रटिकाकार श्री विलास पाटील, माजी मुख्याध्यापक तांदलवाडी माध्यमिक  विवेकानंद प्रतिष्ठान संचलित श्रवण मंदिराचे उपशिक्षक श्री.सतीश पाटील, चोपडा तालुक्यातील विविध विद्यालयांचे शिक्षक बंधू - भगिनी यांची प्रमुख उपस्थिती होती. या सत्रात खान्देश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी  व विद्येचे आराध्य दैवत सरस्वतीचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सतीश पाटील सर यांनी केले तर उद्घाटन सत्राची उद्घोषणा श्री पी एस गुजराथी यांनी केली. तंत्रज्ञानाच्या युगात वाचन प्रेरणा मिळावी व वाचनातून लेखन विकसित व्हावे. भविष्यात शांता शेळके, बहिणाबाई, कुसुमाग्रज, पु ल देशपांडे यासारखे आदर्श लेखक निर्माण व्हावेत या उदात्त भावनेने कुमार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते व तळागाळातल्या विद्यार्थ्यांना एक आदर्श मंच उपस्थित करून देण्यात येतो. या संदर्भात आयोजकांचे आभार व्यक्त करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी स्वरचित काव्यवाचन, कथाकथन, परिसंवाद, अभिवाचन इत्यादी साहित्य प्रकार घेण्यात आलेले होते. तालुक्यातून अतिशय मोलाचे सहकार्य विद्यालयांकडून प्राप्त झाले. अनेक विद्यार्थ्यांद्वारे उद्याच्या भारताचे लेखक दिसत होते. अतिशय सुंदर पद्धतीनेविद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने साहित्याची गुंफण करीत आपले साहित्यप्रकार परीक्षक व मान्यवरांसमोर मांडलेत. चारही साहित्य प्रकारात एकूण 150 विद्यार्थी सहभागी होते. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन श्री गोसावी यांनी केले तर समारोप सत्रात परीक्षक म्हणून मत मांडताना कवी अशोक सोनवणे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व विद्यार्थ्यांनी सादर केलेले साहित्य हे भारतीय समाजासाठी असलेला एक अमूल्य ठेवा आहे. चुकांकडे लक्ष न देता उत्कृष्ट प्रयत्न करा, आयुष्यात सुंदरतेची कास धरा, चांगल्या सवयी जोपासा याविषयी त्यांनी या भावी लेखकांना शुभेच्छा दिल्यात.

' यश मिळाले नाही तरी चालेल पण यशाचे साक्षीदार जरूर व्हा ' असा सल्ला दिला. तुमच्यातील आदर्शाचा ठेवा जपा हे मोलाचे शब्द देखील दिलेत. या सत्राचे सूत्रसंचालन श्रीमती योगिता बोरसे यांनी तर आभार प्रदर्शन श्री तुषार लोहार यांनी केले. विवेकानंद प्रतिष्ठानचे प्रतिनिधी श्री सतीश पाटील सर यांनी देखील आयोजनाबद्दल आभार व्यक्त केले.कार्यक्रमाचे सुंदर असे फलक लेखन कलाशिक्षक श्री.कमलेश गायकवाड सरांनी केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पी एस गुजराथी,उपमुख्याध्यापिका श्रीमती माधुरी पाटील,संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य व  पदाधिकारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने