चोपडा नगरपरिषद निवडणूक रणधुमाळी.. शरदचंद्र पवार यांचे निष्ठावंत समर्थक माजी विधानसभा सभापती अरुणभाई गुजराथी कार्यकर्त्यांसह अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर.. उद्या मुंबईत होणार प्रवेश सोहळा?
चोपडा दि.१०(प्रतिनिधी)नगरपरिषद निवडणुकीत रोजच नवीन नवीन घडामोडी घडत असल्याने राजकीय भूकंप होत आहेत. त्यामुळे चांगलाच धुराडा निवडणूक रिंगणात उडण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून मैदानातील खेडाळूंचा संघ जाहीर व्हायला विलंब होत असल्याने शहरवासीयांची उत्सुकता वाढली आहे. या घडामोडींचा क्रम वाढत असून उद्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वेसर्वा माजी विधानसभा सभापती अरुणभाई गुजराती यांच्यासह दिग्गजांचा एक मोठा चमु देखील राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश घेत असल्याने नवीन समीकरण तयार होऊन राजकिय गणित सोडवताना गणितीय तज्ज्ञांना ही परिक्षा मेरिट लिस्टसाठी कसोटीची होण्याचे संकेत आहेत.
उद्या मुंबईत महिला बालकल्याण कार्यालयासमोरील हॉलमध्ये होणाऱ्या प्रवेश सोहळ्यास खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह दिग्गज नेते हजेरी लावणार आहेत.दरम्यान चोपडा येथून अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश घेण्याकरिता चार लक्झरी गाड्या भरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अनेक पदाधिकारी रवाना होत आहेत.त्यात माजी विधानसभा सभापती अरुणभाई गुजराती, चोपडा पीपल्स बँक चेअरमन चंद्रहासभाई गुजराती,शहराध्यक्ष समाधान माळी, चोसाका माजी चेअरमन घनःश्याम निंबा पाटील, शहराध्यक्ष श्यामभाई परदेशी,शशी देवरे, शशिकांत पाटील, उद्योगपती सुनील जैन,नेमीचंद जैन, माजी नगरसेवक डॉ. रविंद्र भास्कर पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
एकंदरीत या निवडणूकीत वरिष्ठ पातळीवरील युती ला तिलांजली देत स्थानिक पातळीवरील गट तयार होऊन निवडणूक लढविली जाईल.कॉंग्रेसची भुमिका स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा आदेश वरिष्ठांनी एका बैठकीत दिल्याची खात्रीलायक माहिती आहे . म्हणजे ते स्थानिक पातळीवर निर्णय घेतील. शिवसेना शिंदे गटपक्ष, भाजप पक्ष,शरद पवार राष्ट्रवादी पक्ष, अजित पवार राष्ट्रवादी पक्ष, उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष, कॉंग्रेस पक्ष, बसपा हे पक्ष कोण कोणाशी कशी युती करतील का स्वतंत्र उमेदवार उभे करतील हे चित्र आज जरी स्पष्ट नसले तरी एक दोन जीवसात फायनल होऊन प्रचाराची घोडदौड सुरू होईल.उद्याच्या प्रवेश सोहळ्याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे. पक्षांची भूमिकाही लवकरच स्पष्ट होईल.
