चोपडा नगरपालिका निवडणुक आखाड्यात जबरदस्त राजकीय उलथापालथाची समीकरणे.."कौन बनेगा कटप्पा..तो कौन बनेगा बाहुबली..!

 चोपडा नगरपालिका निवडणुक आखाड्यात जबरदस्त राजकीय उलथापालथाची समीकरणे.."कौन बनेगा कटप्पा..तो कौन बनेगा बाहुबली..!



 चोपडा दि.९(प्रतिनिधी) – राजकारण म्हटलं की केव्हाही, कधीही, काहीही होऊ शकते.हे सर्वसामान्य जनता वारंवार पाहू लागली आहे त्यामुळे त्यात काही नवीन वाटण्यासारखे नाही. कोण केव्हा कोणत्या पक्षात जाईल  हे काही सांगता येत नाही.  माजी विधानसभा सभापती अरुणभाई गुजराती यांच्या छत्राखाली राष्ट्रवादी पक्षात राजकीय वाटचाल करणारे श्री.जीवन भाऊ चौधरी ह्यांनी आता दोन दिवसांपूर्वी भाजपाचा झेंडा हाती घेतला आहे. त्याचे कारणही तसेच आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे पाऊल उचललेले आहे. जीवनभाऊ चौधरी हे माजी नगरसेवक ते पत्नी सौ.मनिषाताई चौधरी ह्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे.सध्या तालुक्यात राष्ट्रवादीचे दोन गट असल्यामुळे त्यांनी भाजपाची वाट धरली आहे.त्यांनी पत्नी व मुलीसह  माजी नगरसेवकांची एक टिमच सोबत नेऊन भारतीय जनता पार्टी पक्षात धुमधडाक्यात प्रवेश केला आहे.त्यात चार पाच नगरसेवक ,जि.प.सदस्य,वकिल, उद्योजक व कार्यकर्त्यांचा समावेश आहे.एकंदरीत या पक्ष प्रवेशाने स्थानिक राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.थेट संकट मोचक व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खंदे समर्थक असलेले मंत्री ना.गिरीशभाऊ महाजन यांनी चोपडा नगरपरिषद निवडणुकीत लक्ष घातल्याचे अप्रत्यक्ष बोलले जात आहे.या हालचाली पाहता पुन्हा" चौधरी परिवारा"कडे नगराध्यक्षपदाची धुरा देण्यासाठी कंबर कसली जाण्याची शक्यता बळावली आहे.तर दुसरीकडे तालुक्याचा व शहराच्या सर्वांगीण विकासासाठी झिजणारे विकासाचे शिल्पकार कार्य सम्राट आमदार प्रा.चंद्रकांत बळीराम सोनवणे व माजी आमदार सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे यांची "फिल्डींग" विकास कामांचे जोरावर जोरात असून नगराध्यक्षपदाचा दावेदार घोषित नसल्याने शहरवासीय उत्स्तूक आहेत.

चोपडा नगरपालिका नगराध्यक्षपद हे ओबीसी महिला राखीव झाल्याने अनेकांना नाराजीला सामोरे जावे लागले असून नवीन चेहऱ्यांची आगे कूच होण्याची शक्यता आहे. या निवडणूक समीकरणात कोणता पक्ष कोणाशी सुत जुळवून आघाडी करतो हे अनभिज्ञ असून कोण कुठून इलेक्शन लढवेल याचा भरवसा नाही. एक-दोन दिवसात कोणते कोणते पक्ष एकत्र येऊन आघाडी करतात यावर सर्व खेळ सुरू होण्याची  चिन्हे आहेत. राष्ट्रवादीचे अजित पवार गट, शरद पवार गट हेही काय भूमिका घेतात यावर राजकीय धुरंदरांची लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे  शिवसेना शिंदे गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट, भाजप, काँग्रेस पक्ष, बहुजन समाज पार्टी हेही काय पाऊल उचलतात यावर नगराध्यक्ष व नगरसेवकांची मोट बांधली जाणार आहे. 

चोपडा येथील राष्ट्रवादी चे जीवन भाऊ चौधरी, माजी नगराध्यक्ष मनीषाताई चौधरी, मुलगी साधना चौधरी, माजी नगरसेविका सौ दिपाली चौधरी, माजी नगरसेवक कृष्णा वसंत पवार, माजी नगरसेविका मीनाताई प्रकाश शिरसाट, माजी नगरसेवक जितेंद्र तात्यासाहेब देशमुख, माजी नगरसेवक सिताराम तुकाराम पारधी, माजी जि. प. सदस्या निलीमा पाटील उद्योजक युवराज चौधरी, एडवोकेट रुपेश घनःश्याम पाटील, रणजीत देशमुख, मनोज चित्रकथी, नितेश मुकुंद भावसार यांच्या भाजप प्रवेशात मंत्री ना. संजय सावकारे ,मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिताताई वाघ, आमदार मंगेश चव्हाण, आमदार अमोल जावळे ,आमदार राजू मामा भोळे यांची खास उपस्थिती होती. त्यामुळे चोपड्यात भाजप पक्ष वाढीसाठी  जोमाने हालचाली सुरू झाल्या आहेत.तर शिवसेना शिंदे गटाकडून निवडणूक आखाडा जवळपास तयार होण्याचा मार्गावर  असून उमेदवारांच्या नावावर लवकरच शिक्कामोर्तब होऊन निवडणूक आखाड्यात उतरतील अशी व्यूह रचना सुरू आहे. यावेळी माघारी नंतर उमेदवारांना पाच-सहा दिवसच प्रचाराला वाव मिळणार असल्याने घाई घाईत प्रचार करावा लागणार असल्याने "अति घाई संकटात नेई"अशी गत ही काहींच्या नशिबी येणार आहे.तूर्त तरी एव्हढे च म्हणावे लागेल "अभि तो झाकी है, घोडा मैदान अभी बाकी है "

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने