चिमुकल्या स्वातंत्र्यवीरांचा उत्साह; मुक्तांगण प्री-स्कूलचा आगळा-वेगळा उपक्रम
लासुर ता.चोपडा दि.16(प्रतिनिधी)– स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मुक्तांगण प्री-स्कूल, लासुर येथील तीन ते पाच वर्षांच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायतीपर्यंत आकर्षक प्रभात फेरी काढून ग्रामस्थांचे मन जिंकले. या प्रभात फेरीत लहान मुलांनी देशभक्तीपर घोषणा देत उत्साहाने सहभाग नोंदवला.
चिमुकल्या बालकांनी विविध स्वातंत्र्यसैनिक आणि समाजसुधारकांच्या वेशभूषा परिधान करून हा दिवस अधिक रंगतदार केला. लोकमान्य टिळक, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, नेताजी सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, पंडित जवाहरलाल नेहरू, झाशीची राणी, भारत माता, माता जिजाऊ अशा महान व्यक्तींच्या वेशभूषेत सजलेली चिमुकली मुलं ग्रामस्थांचे आकर्षण ठरली.
प्रभात फेरी ग्रामपंचायत परिसरात पोहोचल्यावर बाजार चौकात सामूहिक ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. या वेळी लासुर गावच्या प्रथम नागरिक सरपंच ताईसो. नर्मदा भिल्ल यांनी ध्वजारोहण केले. ग्रामस्थांनीही उपस्थित राहून चिमुकल्यांना प्रोत्साहन दिले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुक्तांगण प्री-स्कूलच्या शिक्षिका श्रीमती श्रेया म्हैसरे, वैष्णवी कोळी, शुभांगी सोनवणे आणि गायत्री वाघ यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाची सांगता चिमुकल्या विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून आनंदी वातावरणात करण्यात आली. या उपक्रमातून लहानग्यांमध्ये देशभक्तीची भावना रुजवण्याचा प्रयत्न यशस्वी झाला.