चोपड्यात अनैतिक संबंधातून अनोळखी इसमाचा दगडाने ठेचून खून.. मध्यरात्रीला अंधारातला थरार सकाळी उजेडात

 चोपड्यात अनैतिक संबंधातून अनोळखी इसमाचा दगडाने ठेचून खून.. मध्यरात्रीला अंधारातला थरार सकाळी उजेडात

♦️ पोलिसांनी कसब पणाला सात तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या !सीसीटीव्ही फुटेज वरून गुन्ह्याचा उलगडा 

♦️ कचरा वेचणाऱ्या पती हत्यारा.. पत्नीस जबर मारहाण 

♦️ अनोळखी मयताच्या गुप्तांगालाही दुखापत.. अंगात काळा टी शर्ट , पॅन्ट  व रक्ताने माखलेला गमछा घटनास्थळी आढळला 


चोपडा दि.२४( प्रतिनिधी ):पत्नीजवळ  नको त्या अवस्थेत  असलेल्या ५० वर्षीय अनोळखी इसमावर  काठीने व दगडाने हल्ला चढवत  खून केल्याचा भयावह  प्रकार पतीचा हातून घडल्याने शहरभर प्रचंड खळबळ उडाली आहे.या मध्यरात्रीला  झालेल्या हत्याकांडात पत्नीही मारहाणीत चांगलीच जखमी  झाली असून उपचारार्थ दवाखान्यात भरती करण्यात आले आहे. हा प्रकार सकाळी ९ वाजेच्या  सुमारास शहरातील पंचायत समिती कार्यालया समोर असलेल्याअल्पबचत भवन परिसरात उघडकीस आल्यानंतर पोलिस चक्रे जोरात फिरू लागल्याने काही तासांतच आरोपीस हतकडीत अडकविण्यात यश आले आहे.मात्र घृणास्पद कृत्याने बळी पडलेल्या अनोळखी मयताची ओळख पटलेली नसल्याने मयत कोण? हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.दरम्यान परिसरातील सीसीटीव्ही फुटेज वरून पडदाफार्श होण्यास मोठी मदत मिळाली आहे.

   घटनेतील  मारेकरी मध्यप्रदेशातील राजेश काशिराम बारेला (वय- ३३) रा.चाचऱ्या ता.वरला हल्ली मुक्काम चोपडा व जखमी पत्नी (वय-३५) रा.टक्यापाणी ता.वरला हल्ली मुक्काम चोपडा हे दोघे  शहरात गेल्या अनेक वर्षापासून मजुरी करण्यासाठी वास्तव्यास असून,सध्या दोन्ही जण प्लॅस्टिक कचरा गोळा करण्याचे काम करीत आहेत.शहरात दिवसभर प्लॅस्टिक कचरा गोळा करून तो विकून दोन्ही जण रात्री पंचायत समिती कार्यालयासमोर बंद अवस्थेत असलेले अल्पबचत भवन आणि शेजारीच ओस पडलेले सभापती निवासस्थाना जवळ रात्री मुक्कामाला थांबत होते दरम्यान नेहमी प्रमाणे राजेश काशिराम बारेला व सदरील महिला हे दोन्ही अल्पबचत भवनच्या आवारात दि.२३ मे रोजी शुक्रवारी रात्री झोपलेअसतांना रात्री १२ वाजेच्या सुमारास एक ५०वर्षीय इसम फिरत फिरत तेथे पोहचला यावेळी सदरील महिला हिच्याशी अनोळखी इसम अनैतिक संबंध करतांना तिचा पती राजेश बारेला यास दिसून आल्याने त्याने रागाच्या भरात अनोळखी इसमाच्या तोंडावर दगडाने मारहाण करून त्याचा निर्घृण खून केला. शहरात अल्पबचत भवन शेजारी असलेल्या दुकाने सकाळी ८ वाजता उघडल्यानंतर  संबंधितांना पाठीमागील अल्पबचत भवनच्या आवारात एक अनोळखी इसमाचा खून झाल्याचे उघडकीस आल्याने घटनेची खबर शहर पोलिसांना मिळाली त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब घोलप,शहरचे पोलीस निरीक्षक मधुकर सावळे हे पोलीस कर्मचारी घेऊन घटनास्थळावर पोहचले यावेळी स्थानिक पोलीस व फॉरेन्सिक कर्मचार्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मयताचे शव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.अनोळखी इसमाचे शनिवारी दुपारी शवविच्छेदन करण्यातआले.त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यातील माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवून दुपारी ३ वाजता संशयित आरोपी राजेश काशिराम बारेला (वय- ३३) रा.चाचऱ्या ता.वरला हल्ली मुक्काम चोपडा यास ताब्यात घेतले.तपासात आरोपीने पोलिसांना अनोळखी इसमाचा दगडाने ठेचून खून केल्याची कबुली दिली आहे .

घटनेचा उलगडा आणि पोलिसांनी अवघ्या काही तासांतच लावला छडा.. यांचा सविस्तर घटना वृत्तांत असा 

पोलिस सुत्रांकडून प्राप्त प्राथमिक अशी की,आज दिनांक 24/05/2025 रोजी पोकॉ.संतोष पारधी हे नियमित कर्तव्यावर असताना सकाळी 09-30 वा चे सुमारास त्यांना समजले की, भूमिअभिलेख कार्यालयाच्या समोर, जुने पंचायत समिती कार्यालय चोपडा येथे एका पुरुषाचा मृतदेह पडलेला आहे. सदरबाबत त्यांनी तात्काळ पोलीस निरीक्षक श्री मधुकर साळवे यांना माहिती दिली व त्यानंतर अधिकाऱ्यांसह पोलिसांचा ताफा सदर घटनास्थळी पोहोचला असता जुन्या बंद पडलेल्या पंचायत समिती कार्यालयाच्या गेटच्या आत मोकळ्या जागेमध्ये एक अंदाजे 50 वर्षे वयाच्या पुरुषाचा मृतदेह पडलेला होता. त्याच्या अंगात काळे टिशर्ट होते. पँट बाजुलाच पडलेली होती. बाजुलाच एक रक्ताने माखलेला गमछा पडलेला होता. मृतदेहाच्या चेहऱ्यावर मार लागलेला होता. त्याचप्रमाणे मयताच्या गुप्तांगाजवळ देखिल दुखापती करण्यात आल्या होत्या. मृतदेहाच्या आजुबाजुला जमिनीवर देखिल रक्त सांडलेले दिसत होते. बाजुलाच एक रक्ताने माखलेला दगड व एक रक्ताने माखलेली काठी पडलेली होती. एकंदरीत मयतास दगडाने व काठीने मारहाण करून त्यास मारून टाकल्याचे दिसुन येत होते. मृतदेह पंचनामा करून शवविच्छेदनाकामी उपजिल्हा रुग्णालय, चोपडा येथे पाठवण्यात आला.

सदर ठिकाणी आजुबाजुला पोलिसांनी चौकशी केली असता तेथे एक कचरा वेचणारे जोडपे रात्री झोपायला येत असते अशी माहिती मिळाली. त्याप्रमाणे सभोवतालच्या परीसरात शोध घेतला असता महिला , (वय 35 वर्षे) ही जखमी अवस्थेत बाजुलाच आडोशाला झोपलेली मिळून आली. तीला उठवुन विचारपुस केली असता तीने सांगीतले की, मी राजु काशिनाथ बारेला,( वय 35 वर्षे) याचेसह कचरा वेचण्याचे काम करते व रात्री दोघे तेथेच झोपतो. आदल्या दिवशी रात्री 10-00 वा चे सुमारास मी चोपडा येथील महाराज चौकात गेली असताना एक इसम सारखा माझ्या मागेमागे येत होता. मी जेथे जाईल, तेथे तो माझ्या जवळ यायचा. तेथुन काही वेळाने मी जुन्या पंचायत समिती कार्यालयाकडे आले असता तोदेखिल माझे मागे आला व गेटच्या आत येवुन माझेसोबत पैंट काढून झोपला. राजु काशिनाथ बारेला याने अनोळखी इसम माझ्यासह झोपलेला पाहुन रागावुन अनोळखी इसमाला काठीने मारहाण करून दगड डोक्यात घातला व मला काठीने मारहाण केली. अनोळखी इसमास गंभीर मार लागल्याने तो मयत झाला. मला पण मार लागलेला आहे. सदर महिलेला तात्काळ उपचारासाठी उपजिल्हा रूग्णालय, चोपडा येथे पाठवण्यात आले आहे.

पोलीसांनी परीसरातील आदल्या दिवशीचे रात्रीचे सिसीटीव्ही पाहण्यास सुरवात केली असता महिला  ही रात्री 10-56 वा चे सुमारास मयत अनोळखी इसमासोबत छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात फिरताना दिसत होती व त्यानंतर ते दोघे घटनास्थळी गेलेले दिसत आहेत. तसेच घटनास्थळाजवळील गेटमधुन 02-10 वा इसम नामे राजु काशिनाथ बारेला हा बाहेर पडताना दिसत आहे.

राजु काशिनाथ बारेला याचा शोध घेत असताना तो वडारवाडी, मार्केट कमिटी, चोपडा येथे असल्याबाबत पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून त्यास ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे विचारपुस केली असता त्याने मयत हा रात्री 02-00 वा चे सुमारास त्याच्या पत्नीसोबत झोपलेला पाहुन राग अनावर होवुन त्यास दगडाने व काठीने मारहाण केली व तो मयत झाल्याचे सांगीतले. त्यावरून त्यास पोलिसांनी अटक केली असून मयताची रात्री उशिरापर्यंत ओळख पटलेली नव्हती.

चोपडा शहर पोलीस ठाण्यात पोहेकॉ संतोष ज्योतीराम पारधी (वय 48 वर्षे) यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांत पो.स्टे. (भाग 5) CCtNS NO. रजि. नं.332/2025 बि.एन.एस. कलम 103 (1), 118(1) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.पुढील उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि मधुकर साळवे तपास एपीआय एकनाथ भिसे, पीएसआय अनिल भुसारी हे करीत आहेत...

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने