चोपडा नगरपरिषदेत सफाई कामगाराने फडकाविला झेंडा अन् सर्व जण अवाक्..
♦️देश व राज्य पुढे नेण्यासाठी कामगारांची कथा आणि व्यथा समजून घेणे काळाची गरज: मुख्याधिकारी राहुल पाटीलांचे सुतोवाच
चोपडा दि.१(प्रतिनिधी)कामगारांच्या मेहनती शिवाय देश व राज्य कुठलीही आगे कूच करू शकत नाही त्यासाठी कामगारांना योग्य तो मोबदला आणि न्याय मिळणे अत्यंत गरजेचे आहे तरच कामगार दिवस खऱ्या अर्थाने साजरा होणार आहे . त्यांच्या जीवनमानात सुधारणा करण्याचा निर्धार प्रत्येकाने केला पाहिजे असे मत चोपडा न.पा.चे मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी व्यक्त केले आहे. चोपडा नगरपालिकेच्या ध्वजारोहण देखील खुद्द सफाई कामगारांच्या हस्ते करून अनेकांना कामगारांच्या कामाचे अनन्य साधारण महत्व असल्याची जाणीव करून दिली आहे. १ मे या कामगार दिवसांच्या चोपडा नगरपालिका आवारात आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की,1 मे महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनानिमित्त, आपल्या देशाच्या आणि राज्याच्या प्रगतीसाठी कष्ट करणाऱ्या कामगारांच्या कष्टांचा सन्मान करणे होय . हा दिवस कामगारांच्या कष्टांची आठवण करून देणारा आणि त्यांच्या हक्कांचा सन्मान करणारा दिवस आहे. जगभरात लाखो कामगार आपल्या परिश्रमातून देशाच्या प्रगतीसाठी योगदान देतात. कारखाने, बांधकाम, शेती, वाहतूक, सेवा क्षेत्र – अशा अनेक ठिकाणी ते झटत असतात. त्यांच्या श्रमाशिवाय कोणतेही राष्ट्र पुढे जाऊ शकत नाही.असे असल्यावर ही आज अनेक ठिकाणी कामगारांना योग्य वेतन, असुरक्षित कामाचे ठिकाण, आणि मानवी हक्क मिळालेले नाहीत. त्यामुळे हा दिवस केवळ साजरा करणे नव्हे तर कामगारांच्या जीवनमानात सुधारणा करण्याचा निर्धार केला पाहिजे असे परखड मत त्यांनी व्यक्त केले आहे.
काम करणाऱ्या प्रत्येक हाताला सन्मान मिळावा हेच १ मेच्या साजरी करणाचे खरे प्रयोजन असल्याचे सांगून या झेंड्याखाली आपण एक आहोत, आणि आपल्या देशाच्या भविष्यासाठी एकत्र काम करू या असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
"विशेष म्हणजे कामगार दिनानिमित्त चोपडा नगरपरिषद मध्ये कार्यरत असलेल्या सफाई कामगार व घंटागाडी कामगार यांना ध्वजारोहणाचा मान देऊन खऱ्या अर्थानं कामगार दिवस साजरा केल्याची झलक चोपड्यात दिसून आली."अधिकरी असावा तर राहुल पाटलां सारखा असावा " असे बोलं सफाई कामगारांच्या मुखातून निघाल्याने अनेकांच्या ह्रदयाचे तार छेडून गेलेत."