बालयोगी सदानंद महाराज आश्रमात २ते ४ में दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम
♦️सत्यनारायण पूजा - श्रीविष्णु याग सोहळा, नाट्यप्रयोग , मोफत आरोग्य शिबीर , भजन , कीर्तनाची भाविकांना मेजवानी
........................................................
वसई, ता . १(प्रतिनिधी)---- सुप्रसिद्ध संतश्री बालयोगी सदानंद महाराज यांनी राई ( भाईंदर पश्चिम , जिल्हा ठाणे ) येथील आपल्या राहत्या घराचा त्याग करून वैशाख शुद्ध सप्तमी १ मे 1971 रोजी तुंगारेश्वर पर्वत राजीतील तीर्थक्षेत्र परशुराम कुंडावर तपसाधनेला प्रारंभ केला . या दैवी घटनेला यंदा ५४ वर्षे पूर्ण होत आहेत . सदानंद महाराज यांच्या परशुराम कुंडावरील आगमनदिनानिमित्त बालयोगी सदानंद महाराज आश्रम संस्थेने शुक्रवार २ मे ते रविवार ४ मे असे तीन दिवस परशुराम कुंडावर श्रविष्णुयाग , श्रीसत्यनारायण पूजा, नाट्यप्रयोग , मोफत आरोग्य शिबीर , भजन , कीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. प्रतिवर्षी हजारो भक्तजन या सोहळ्यात सहभागी होत असतात.
बालयोगी सदानंद महाराज यांनी वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी मंगळवार ता . २७ एप्रिल १९७१ रोजी अक्षय तृतीयेच्या शुभदिनी तपसाधनेसाठी केलेला गृहत्याग आजच्या युगातील आश्चर्य समजले जाते. तर सदानंद महाराजांनी १ मे १९७१ रोजी तुंगारेश्वर पर्वत राजीतील सर्वोच्च शिखर असलेल्या तीर्थक्षेत्र परशुराम कुंडावर पहिले पाऊल ठेवले आणि तपश्चर्येला प्रारंभ केला. सदानंद बाबांच्या परशुराम कुंडावरील आगमनदिनानिमित्त प्रतिवर्षी आश्रम संस्थेच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदाही बालयोगी सदानंद महाराज आश्रम संस्थेने श्रीविष्णु याग, श्रीसत्यनारायण महापूजा, मोफत आरोग्य शिबीर, भजन कीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. विशेष म्हणजे या वर्षी बालयोगी सदानंद महाराज यांनी लिहिलेल्या " संत तुका विठूचा " या संगीत नाटकाचा प्रयोग सादर केला जाणार आहे.
तीर्थक्षेत्र परशुराम कुंडावर शुक्रवार २ मे रोजी बालयोगी सदानंद महाराज यांच्या शुभहस्ते श्रीविष्णु यागास प्रारंभ होणार आहे. रविवार ४ मे रोजी श्रीविष्णु याग पूर्णाहुती आणि श्री सत्यनारायण महापूजा संपन्न होणार आहे. ३ आणि ४ मे रोजी विविध रोगांवरील मोफत वनौषधी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तर रविवार ४ मे रोजी रात्री ९ वाजता बालयोगी सदानंद महाराज यांनी लिहिलेल्या " संत तुका विठूचा " या नाटकाचा प्रयोग सादर केला जाणार आहे. यावेळी महाराष्ट्र भूषण हभप प्रकाश महाराज म्हात्रे ( डोंबिवली ) यांचे कीर्तन, भजनरत्न महादेव बुवा शहाबाजकर , सौ . मिनल ताई पाटील, कुमार गंधर्व यांच्या भजन तसेच शास्त्रीय संगीतचे आयोजन करण्यात आले आहे. माऊली हरीपाठ मंडळ , वडवली, जनार्दन भजन मंडळ,शिव प्रासादिक भजन मंडळ, हनुमान प्रासादिक भजन मंडळांचे भजनाची सेवाही असणार आहे. तीर्थक्षेत्र परशुराम कुंडावरील या सोहळ्याला भाविकांची मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन बालयोगी सदानंद महाराज आश्रम संस्थेच्या विश्वस्त मंडळाने केले आहे.
......................................