चोपड्यात क्रांती दिनी रोजगाराची महाक्रांती; रोटरी क्लब व भगिनी मंडळ शैक्षणिक संकुलाचा संयुक्त उपक्रम

 चोपड्यात क्रांती दिनी रोजगाराची महाक्रांती; रोटरी क्लब व भगिनी मंडळ शैक्षणिक संकुलाचा संयुक्त उपक्रम


चोपडा,दि.१०(प्रतिनिधी) - येथील रोटरी क्लब ऑफ चोपडा, भगिनी मंडळ संचलित समाजकार्य महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व युवाशक्ती फाउंडेशन (नाशिक) यांच्या एकत्रित प्रयत्नातून चोपडा तालुक्यात क्रांती दिनाच्या दिवशी रोजगाराची क्रांती घडवून आणत या उपक्रमातून सुमारे चारशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी मुलाखतीत सहभाग घेतला. पात्र युवकांना तात्काळ नोकरीसाठी हजर होण्यासाठी अपॉइंटमेंट लेटर देण्यात आले.

          तालुक्यातील इयत्ता आठवी ते बारावी उत्तीर्ण, पदवी व पदव्युत्तर, आय टी आय, पॉलिटेक्निक, इ . शिक्षण घेतलेल्या बेरोजगार तरुणांसाठी महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज सन्स, लेग्रांड, एम डी इंडस्ट्रीज ऑटो, रिंग प्लस ॲक्वा यासारख्या विविध कंपनीमधून सुमारे ४०० बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. 

दि. ९ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन व क्रांती दिनी समाजकार्य महाविद्यालय चोपडा येथे या तालुकास्तरीय भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. रोजगार मेळाव्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रा. अरुणभाई गुजराथी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून युवाशक्ती फाऊंडेशनचे वैभव कुलकर्णी उपस्थित होते. बेरोजगारीने समाजात काय नुकसान होते व नोकरी असल्यावर समाजात कसा बदल होतो व समाजाचा विकास कसा होतो याबाबत, प्रा. अरुणभाई गुजराथी यांनी विस्ताराने सांगितले. तर वैभव कुलकर्णी यांनी युवाशक्ती फाउंडेशन मार्फत आलेल्या कंपन्यामधील प्रतिनिधी बेरोजगार उमेदवारांकडून कुठलाही छुपाखर्च घेत नाहीत. तसेच पात्र युवकांना नोकरी देण्यात येतील व त्यासाठी ते बांधील राहतील, असे सांगितले. जळगाव येथील जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रशांत पाटील यांनी नोकरीबाबत असणारा खुलासा करत स्वयंरोजगार कसा वाढवावा व रोजगाराच्या संधी निर्माण करून दुसऱ्याला नोकरीवर ठेवावे या गोष्टी आलेल्या युवक युवतींना सांगितल्या. तसेच समीर भाटिया यांनी 'लाडका भाऊ' या योजनेचा विद्यार्थ्यांनी कसा उपयोग करावा व कशा पद्धतीने नोंदणी करावी याबाबत सखोल माहिती दिली. याप्रसंगी मंचावर भगिनी मंडळ संस्थेच्या अध्यक्ष पूनम गुजराथी, उद्योजक आशिष गुजराथी, समाजकार्य महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. आशिष गुजराथी हे उपस्थित होते.

         या भव्य रोजगार मेळाव्यासाठी रोटरी क्लबचे प्रकल्प प्रमुख ॲड. रुपेश पाटील, सह प्रकल्प प्रमुख सनी सचदेव, क्लब अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ. ईश्वर सौंदाणकर, सचिव बी. एस. पवार, कोषाध्यक्ष प्रदीप पाटील बा, सहसचिव संजय बारी, सदस्य विलास पाटील, विलास कोष्टी, चंद्रशेखर साखरे तसेच भगिनी मंडळ संचलित समाजकार्य महाविद्यालय, कला व वाणिज्य महाविद्यालय, नर्सिंग स्कूल, कृषी तंत्र विद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व ललित कला केंद्र येथील प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी, युवाशक्ती फाऊंडेशनचे सुधीर शिरसाठ, सागर पवार यांनी परिश्रम घेतले. या मेळाव्याच्या प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. सौंदाणकर यांनी रोजगार मेळाव्याचा उद्देश स्पष्ट करत भगिनी मंडळ शैक्षणिक संस्थेत व्यावसायिक अभ्यासक्रम गेल्या ३५ वर्षापासून सुरू असल्याचे सांगितले. तसेच लवकरच महाविद्यालयात रोजगार केंद्र सुरु करुन तालुक्यातील युवकांना रोजगार मिळवून देण्यास मदत करणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. राहुल निकम यांनी केले तर आभारप्रदर्शन अनिल बाविस्कर यांनी केले. 

शिव्यामुक्त समाजासाठी शपथ

मास्वे या समाजकार्य महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांची संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रभरात समाजकार्य पंधरवाडा सुरु करण्यात आला आहे. यात समाजात माताभगिनींच्या नावाने गलिच्छ शिव्या दिल्या जातात यामुळे सर्व स्त्री जातीचा अपमान होतो. म्हणून शिव्यामुक्त समाज घडावा, या उद्देशाने शिव्यामुक्त समाज आंदोलन सुरु करुन त्यात आज सर्वांनी एक शपथ घेतली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने