नवी मुंबईतील जलतरणपटू नील शेकटकरचा नवा विक्रम - मराठी नववर्षाचे विक्रमी स्वागत
मुंबई दि.०३(शांताराम गुडेकर ) : सानपाडा नवी मुंबई येथील जलतरणपटू नील शेकटकर याने गुढीपाडवा अर्थात मराठी नववर्षाचे स्वागत अनोख्या पध्दतीने केले आहे. बेलापूर (नवी मुंबई) ते गेट वे ऑफ इंडिया हे २६ किलोमीटरचे सागरी अंतर नीलने ५ तास ३२ मिनिटात बॅक स्ट्रोक प्रकाराने पोहून पूर्ण करुन वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षीच आणखी एक नवा विक्रम केला आहे. यापूर्वी नीलने एलिफंटा केव्हज् ते गेट वे ऑफ इंडिया हे १५ किलोमीटरचे समुद्री अंतर २ तास ४५ मिनिटांत पूर्ण करून इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये आधीच आपल्या नावाची नोंद केली आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर २ एप्रिल २०२२ रोजी पहाटे १२ वाजून ५४ मिनिटांनी त्याने समुद्रात उडी घेतली आणि केवळ ५ तास ३२ मिनिटात हे अंतर पार करून आणखी एका विक्रमाला गवसणी घातली. अशा प्रकारे बॅक स्ट्रोक पद्धतीने २६ किमीचे सागरी अंतर पार करणारा नील शेकटकर हा सर्वात कमी वयाचा जलतरणपटू ठरला आहे. नील नवी मुंबईच्या वाशी येथील फादर ॲग्नल स्विमिंग क्लब येथे दररोज चार ते पाच तास सराव करतो. याशिवाय आठवड्यातून एकदा उरणच्या समुद्रातही त्याचे प्रशिक्षण सुरु आहे. संदीप यादव, अमित आवळे, किशोर पाटील आणि गोकुळ कामत या नावाजलेल्या जलतरण प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली नीलचा सराव सुरु आहे. नीलच्या कारकीर्दीतला हा महत्त्वाचा टप्पा आहे. यापुढील काळात कठोर मेहनतीच्या पाठबळावर ऑलिंपिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा नीलचा मानस आहे. नीलला लहानपणापासूनच पोहण्याची आवड होती. या आवडीचे रुपांतर स्पर्धात्मक जलतरणात झालं आणि नील सचिन शेकटकरचे नाव सुप्रसिध्द इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंदलं गेलं. गुढीपाडव्याच्या दिवशी अर्थात मराठी नववर्षाचे स्वागत नव्या विक्रमाने करून नील शेकटकरने महाराष्ट्राचे नाव पुन्हा एकदा अभिमानाने उंचावले आहे. नीलने या विक्रमाला गवसणी घातली त्यावेळी नीलचे कौतुक करण्यासाठी आय. ए. एस. अधिकारी विजय नहाटा, मुंबई महानगर पालिकेच्या नगरसेविका अश्विनीताई मते, शिवसेना नवी मुंबई उपजिल्हाप्रमुख मिलिंद सूर्यराव आदि मान्यवर उपस्थित होते. सर्वच स्तरातून सध्या नील शेकटकरवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.