जिल्हा प्रशासनाचे वाळू ठेक्यात दुटप्पी धोरण..? कोळंबा वाळू ठेक्यापेक्षा सुटकार वाळू ठेक्याची रक्कम चार पट कमी.. वाळू ब्रास उत्खननात ही प्रचंड तफावत..! कोळंबा ठेकेदारांना न्याय द्या : प्रदीप शहा व सुनील पाटील यांची मागणी
चोपडा दि.०९(प्रतिनिधी): चोपडा तालुक्यात दोन वाळू गटांचा जाहीर लिलाव दोन टप्प्यांत नुकताच प्रशासनाने जाहीर केला असून अवघ्या एका महिन्याच्या अंतराने झालेल्या लिलावात प्रशासन स्तरांवर ठेक्याच्या रक्कमेत चार पट तफावत झाल्याने वाळू ठेकेदारांसह नागरिकांमध्ये कमालीचा गोंधळ उडाला आहे. पहिल्या ठेक्यात वाळू उपसा कमी रक्कम जास्त तर दुसऱ्या ठेक्यात वाळू उपसा जास्त ब्रासचा तर रक्कम कमी आहे शिवाय पर्यावरण परवानगीचा ९ लाखाचा भूर्रदंडही आमच्या माथी मारण्यात आल्याने आमच्यावर अन्याय झाला असून आम्हास न्याय द्यावा अशी जोरदार मागणी ठेकेदार श्री.प्रदीप शहा व पोट ठेकेदार श्री.सुनील पाटील यांनी केली आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की, जिल्हा प्रशासनाने वाळू ठेक्याची जाहीर लिलाव नोटीस प्रसिद्ध केली होती त्या अनुषंगाने मौजे कोळंबा शिवारातील तापी नदीवरील गट क्रं.३३,३२,३१, ३० व २० लगतचा असा वाळू ठेका मक्तेदार प्रदीप शहा (चामुंडा सप्लायर्स चहार्डी) यांना ६२लाख ३७हजार ३०४ रुपयांत १५२९ ब्रास इतका वाळू उपसा म्हणून देण्यात आला.तर आता मौजे सुटकार शिवारातील गट क्रं.२३,२४,२५,२८व २९ लगतचा वाळू ठेका विजय जाधव (रोशनी ट्रेडर्स अमळनेर) यांना १३लाख ५ हजार ८०० रुपयात २ हजार ब्रास च्या वर (२०९३ब्रास प्राप्त माहितीनुसार) वाळू उपस्याची परवानगी देण्यात आली आहे विशेष म्हणजे कोळंबा येथील ठेकेदारांना पर्यावरण परवानगीसाठी ९ लाखांचा वेगळा भुर्दंड मोजावा लागला आहे तर सुटकार शिवारातील वाळू ठेक्यात प्रशासनाने ठेक्या आधीच पर्यावरणाची परवानगी काढून ठेका दिला आहे.म्हणजेच आम्हांस सापत्नपणाची वागणूक देण्यात आल्याचा आरोप सदरील ठेकेदारांनी केला आहे.
वास्तविक पाहता कोळंबा येथील वाळू ठेक्याची दुसऱ्यांदा जाहीर "फेरलिलाव "करण्यात आला आहे तरीही दोन लिलावाच्या रक्कमेत एव्हढी मोठी तफावत का? प्रशासकीय नियम महिन्या भरात बदलतात काय? एकास एक दुसऱ्यास दुसरा असे शासकीय धोरण असू शकते काय?असे एक ना अनेक प्रश्न या लिलावाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झाले आहेत.तरी जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालून एकसमान नियम ठेवत आम्हास न्याय द्यावा अशी मागणीही वाळू ठेकेदार श्री.प्रदीप शहा व पोट ठेकेदार श्री.सुनील पाटील यांनी केली आहे. उपरोक्त तफावतीमुळे वाळू ठेकेदार,वाळू वाहतूकदार व वाळू वापरकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली असून वाजवी दरात वाळू उपलब्ध व्हावी अशीआशा सर्वसामान्य जनतेतून व्यक्त केली जात असल्याची पुष्टी ही त्यांनी जोडली.