राष्ट्रहितासाठी पंतप्रधानांनी कृषी कायदे मागे घेतले!..भा.कि.संघाचे संघटनमंत्री दादा लाड यांचे प्रतिपादन..जिल्हाध्यक्ष पदी वैभव महाजन
जळगाव दि.२८(प्रतिनिधी) - केंद्र सरकारने शेतकरी हिताचा विचार करूनच शेतकरी कायद्यांचा मसुदा तयार केला होता.त्यात सुधारणा करणे गरजेचे होते त्याबाबत किसान संघाने आपले मत मांडले होते.त्याचा अभ्यास करुन सुधारणा केल्या जात होत्या.परंतु शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली देशविघातक शक्ती एकत्रित येवून वेगळाच धुमाकूळ घालण्याचे मनसुबे रचत होते.सोबतच पंजाबात कम्युनिस्ट, खलिस्तानी चळवळ आणि देशविघातक शक्तींनी एकत्र येवून देश तोडण्याचा प्रयास सुरु असल्याचे लक्षात आल्यामुळे या विद्रोही शक्तीचा शक्तीपात करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रयत्न केल्याचे प्रतिपादन भारतीय किसान संघाच्या अधिवेशनात संघटन मंत्री दादा लाड यांनी येथे केले.
विसनजी नगरातील गायत्री मंदिराच्या आवारात झालेल्या अधिवेशनात बोलतांना श्री.लाड पुढे बोलतांना म्हणाले की,स्वातंत्र्य काळापासून आजतागायत शेतकऱ्यांना पुरेश्या सोयी उपलब्ध करुन देण्यात सरकार कमी पडले.वीज,रस्ते,पाणी या सोयी पूर्ण नसल्या तरी मिळाल्या पण मालाला भाव मिळाला नसल्यामुळे शेतकरी गरिबच राहिला आहे.त्यासाठी शेतमालाला उत्पादन आधारित नफ्यासह भाव मांडण्याची भुमिका किसान संघाची राहिली आहे.
या अधिवेशनात प्रारंभी भगवान बलराम व स्व.दत्तोपंत ठेंगडी यांच्या प्रतिमेचे पूजन जिल्हाध्यक्ष प्रा.मनोहर बडगुजर यांनी केले.परिचय राहुल बारी यांनी करुन दिला.पद्य गायन प्रांत कार्यकारणी सदस्या कपिला मुठे यांनी केले.
जिल्हाध्यक्षपदी वैभव महाजन
या अधिवेशनात येणाऱ्या तिन वर्षांसाठी जिल्हाध्यक्ष पदावर तांदळवाडी ता.रावेर येथील कार्यकर्ते वैभव बळीराम महाजन यांची एकमताने निवड करण्यात आली.तसेच कार्यकारणीत उपाध्यक्ष सौ. सिंधूबाई लक्ष्मण महाजन (धरणगाव),कोषाध्यक्ष श्रीकांत शांताराम नेवे(चोपडा) महामंत्री डॅा.दीपक वामन पाटील (एरंडोल),सहमंत्री राहूल शरद बारी (जामनेर),
या पदाधिकाऱ्यांची निवड जाहिर करण्यात आली आहे.लवकरच नुतन अध्यक्ष महाजन विस्तृत कार्यकारिणी जाहिर करणार असल्याचे सांगण्यात आले.
या अधिवेशनाची सांगता पसायदानाने करण्यात आली.सुत्रसंचलन राहूल बारी यांनी तर आभार प्रदर्शन श्रीकांत नेवे यांनी केले.