*ज्याच्यात देण्याची वृत्ती असते त्याला परमेश्वर कधी कमी पडू देत नाही – १००८ महामंडलेश्वर ज्ञानेश्वर माऊली..आमदार मंगेश चव्हाण यांनी मोफत उपलब्ध करून दिले फटाके, फराळ, कपडे, खेळनी आदींचे २५० हुन अधिक स्टॉल...*
जळगाव दि.३(प्रतिनिधी )कोरोना सारख्या भयानक काळात आपण अनेक मोत्यासारखी माणसे गमावली, जेव्हडी मनुष्यहानी झाली त्यापेक्षा अधिक छोट्या मोठ्या व्यावसायिकांना जो आर्थिक फटका बसला त्यातून त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना सावरायला अनेक वर्षे जावी लागतील. या सर्वांना आधार देण्यासाठी आमदार मंगेश चव्हाण यांनी मोफत जागा व सुविधा उपलब्ध करून दिवाळी बाजार भरवण्याचा प्रयोग केला आहे तो कौतुकास्पद असा आहे. समुद्र हा सतत घेत राहतो म्हणून त्याच्याकडून कुणी अपेक्षा ठेवत नाही मात्र ढग हे सतत देत राहतात म्हणून आपण सर्व त्याची वाट बघतो. आमदार मंगेश चव्हाण यांच्या दातृत्वातून चाळीसगांव तालुक्यातील अनेक घटकांसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. आमदार देतात म्हणून लोकांना त्यांच्याकडून अपेक्षा असते, मात्र हे सर्व पुण्यकर्म करत असताना सत्ता, संपत्ती अविचल असतात मात्र त्याचा वापर जनकल्याणासाठी जो करतो तो खरा माणूस असतो, ज्याच्यात दुसऱ्यांना निस्वार्थपणे देण्याची वृत्ती असते परमेश्वर त्याला कधी कमी पडू देत नाही. माझ्यासह सर्व जेष्ठ श्रेष्ठांचा आशिर्वाद तुमच्यासोबत आहे असे प्रतिपादन १००८ महामंडलेश्वर ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली, सिद्धेश्वर आश्रम बेलदारवाडी यांनी केले. ते चाळीसगांव येथे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत या संकल्पनेला बळ देण्यासाठी आमदार मंगेश चव्हाण व भाजपा चाळीसगांव आयोजित नमो दिवाळी बाजार उद्घाटन समारंभ प्रसंगी बोलत होते. चाळीसगांव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित नमो दिवाळी बाजाराचे उदघाटन १००८ महामंडलेश्वर ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली, सिद्धेश्वर आश्रम बेलदारवाडी व माजी केंद्रीय मंत्री एम.के.अण्णा पाटील यांच्याहस्ते व भारतीय जनता पक्षाचे चाळीसगांव तालुक्यातील जेष्ठ नेते, आजी माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी माजी मंत्री एम.के.अण्णा पाटील यांनी आपल्या मनोगतात भारतीय अर्थव्यवस्था व बाजारपेठ या विषयावर विचार व्यक्त करत मार्गदर्शन केले, इतर देशांच्या मानाने भारताला कमी फटका बसला असला तरी देखील आपल्या गरजा मात्र कमी झाल्या नाहीत, आपल्या देशाचा १५ टक्के हिस्सा म्हणजे १२ लाख कोटींपेक्षा जास्त पैसा हा क्रूड ओईल साठी परदेशी जातो. दुसऱ्या स्थान सोन्याचे असून जवळजवळ ६ ते ७ लाख कोटींचे सोने आपण विदेशातून आयात करतो. ही सर्व परिस्थिती बदलण्यासाठी जास्तीत जास्त गरजा या आपल्या देशातच भागाव्यात यासाठी कोरोना संकटानंतर देशाची आर्थिक घडी बसविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अभियानाला सुरुवात केली, त्याचाच एक भाग म्हणून स्थानिक बाजारपेठेला सुसूत्रता आणत नमो दिवाळी बाजार ही संकल्पना आमदार मंगेश चव्हाण यांनी सुरु केली ती स्वागतार्ह्य असल्याचे देखील एम.के.अण्णा पाटील यांनी सांगितले.
माजी आमदार साहेबरावजी घोडे सर यांनी मंगेशदादा यांच्यासोबतच्या आठवणीना उजाळा दिला, मंगेश दादांच्या मामाचे घर माझ्या शेजारीच असल्याने मी त्यांना लहानपणापासून बघत आहे, मला कुणी विचारले की जिद्द, कष्ट व चिकाटी म्हणजे काय तर मी त्यांना सांगतो की मंगेदादांकडे पहा, कारण अथक कष्ट, प्रवास, धावपळ करून त्यांनी आपले विश्व उभे केले आहे. “जमीर जिंदा रख, कबीर जिंदा रख... सुलतान भी बन जाये तो दिल मै फकीर जिंदा रख, होसलो की तर्कश मे कोशिश का तीर जिंदा रख, हार जाओ गर जमाने मै सबकूच मगर फिरसे जितने की उम्मीद जिंदा रख” असा शेर सांगत त्यांच्या नमो दिवाळी बाजार या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के बी दादा साळुंखे, महिला आयोगाच्या माजी सदस्या सौ.देवयानीताई ठाकरे, जेष्ठ नेते अविनाश सूर्यवंशी, पंचायत समिती गटनेते संजय भास्करराव पाटील यांनी मनोगताच्या माध्यमातून दिवाळी बाजार या संकल्पनेचे स्वागत केले.
आमदार मंगेश चव्हाण यांनी मनोगत सांगितले की, गेली २ वर्ष कोविड महामारी, अतिवृष्टीमुळे सर्वसामान्य व्यावसायिक, व्यापारी, शेतकरी अडचणीत आला आहे. लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला त्याचाच भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी मांडलेल्या आत्मनिर्भर भारत संकल्पना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी व "देऊ व्यवसायिकांना आसरा, तोचि असे दिवाळी दसरा" हे ब्रीदवाक्य घेऊन तसेच खरेदी स्थानिकांकडून, आपल्या माणसांकडून या उद्देशाने हा नमो दिवाळी बाजार भरवला असल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितले.
महिला बचत गटांना मिळाली बाजारपेठ तर व्यावसायिकांनी मानले आमदार मंगेश चव्हाण यांचे आभार.
नमो दिवाळी बाजार येथे चाळीसगांव तालुक्यातील महिला बचत गटांना प्राधान्याने स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यात जवळपास ३५ महिला बचत गटांनी आपल्या विविध वस्तू विक्रीसाठी आणल्याने त्यांना मोठी बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. महिला बचत गटांच्या तालुका समन्वयक विद्या मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. महिलांमधील उद्योजकता वाढावी, स्वतः आत्मनिर्भर होण्यासाठी आमदार मंगेशदादा व शिवनेरी फाउंडेशन च्या अध्यक्षा सौ.प्रतिभाताई यांनी संधी उपलब्ध करून दिली आहे तरी नमो दिवाळी बाजार येथे सर्वांनी भेट देऊन आपल्या स्थानिक माणसांकडून जास्तीत जास्त खरेदी करावी असं आवाहन त्यांनी केले तर पराग कुलकर्णी यांनी सर्व स्टॉल धारकांच्या वतीने मनोगत करताना सांगितले की, पैसा अनेकांकडे असतो मात्र तो समाजासाठी खर्च करण्याची दानत, नियोजन सर्वांकडे नसते. मंगेश दादांनी छोट्या मोठया व्यावसायिकांना मोफत जागा व वीज दिली, स्टॉल उभारून दिला त्यामुळे एका व्यावसायिकाचे किमान ५ ते १० हजार रुपये वाचले आहेत. ही मंगेश दादांची आम्हा व्यावसायिकांना दिवाळी भेटच असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात भारतमाता व छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन करून करण्यात आली. योगायोगाने प्रमुख अतिथी देवयानीताई ठाकरे यांचा वाढदिवस असल्याने मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. सूत्रसंचालन अमोल नानकर यांनी तर प्रास्ताविक जितेंद्र वाघ यांनी केले.