वर्डीत नागरिकांच्या गोंधळाने प्राप्त लसीचे डोस गेले परत ...
अडावद ता.चोपडा (प्रतिनिधी):-
वर्डी ता़ चोपडा येथे ९ सप्टेंबर रोजी नागरिकांसाठी कोव्हीशिल्ड लसीकरण पहिल्या व दुसऱ्या डोस साठी आयोजित करण्यात आले होते. त्यासाठी नागरिकांनी रात्री ९ वाजे पर्यंत आपल्याला लस मिळावी म्हणून त्या ठिकाणी रात्रभर नंबर लावून होते. लसीकरणाला सुरुवात होण्या अगोदरच एक हजारा पर्यंत नागरिक सकाळी नऊ वाजेपर्यंत जमा झाले होते. सकाळी लसीकरण सुरु होण्या अगोदर बंदोबस्तासाठी पाच ते सहा पोलिसही आले होते. परंतु २५० लस उपलब्ध असल्याचे गावात दवंडी देऊन सांगण्यात आले होते. घेणारे मात्र हजाराच्या वर नागरिक उपस्थित होते. रात्रभर रांगेत उभे असल्याने रांगेतच तु तु मै मै व भांडणे झाल्याने .पोलिसांनाही पाचारण करूनही उपयोग झाला नाही. शेवटी शाळेचे गेट मोकळे करून सर्वांचे नंबर मागे -पुढे झाल्याने आरोग्य पथक व नागरिकांमध्ये वाद-विवाद झाले. तसेच नागरिक कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने, आरोग्य कर्मचाऱ्यांनी आणलेल्या लस व साहित्य अडावद उपकेंद्र येथे वापस घेऊन अडावदलाच लसीकरण करण्याचे ठरले, यामुळे मात्र नागरीकांना लसीकरणासाठी अडावद येथे जावे लागले व नाहक पायपीट व मनस्ताप सहन करावा लागला.
गावात लसीकरण शांततेत व्हावे म्हणून गावातून एकही पुढारी व पदाधिकारी सहकार्य करताना दिसून आले नाहीत. गावातील नागरिकांची आरोग्य विषयी ग्रामपंचायतीची जबाबदारी असूनही याकडे सर्रासपणे दुर्लक्ष करत असल्याबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तरी संबधीतांनी येथील लसीकरणाचे नियोजन करुन कुठलेही भेदभाव, पक्षपात न करता लसीककरण शांततेत करण्यासाठी सहकार्य करावे अशी मागणी सुज्ञ नागरीकांनी केली आहे.