जळगावात ९ ऑगस्ट रोजी रानभाजी महोत्सवाचे आयोजन..रानभाज्यांचा आस्वाद घेण्यासाठी नागरीकांनी महोत्सवास भेट देण्याचे कृषि विभागाचे आवाहन




 जळगावात ९ ऑगस्ट रोजी रानभाजी महोत्सवाचे आयोजन..रानभाज्यांचा आस्वाद घेण्यासाठी नागरीकांनी महोत्सवास भेट देण्याचे कृषि विभागाचे आवाहन

            जळगाव, (प्रतिनिधी) दि. 3 - जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्प संचालक, आत्मा, जळगाव, कृषि विज्ञान केंद्र, जळगाव व रोटरी क्लब, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने सोमवार, 9 ऑगस्ट, 2021 रोजी सकाळी 10.30 वाजता रोटरी क्लब, मायादेवी नगर, महाबळ रोड, जळगाव येथे रानभाजी महोत्सावाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्प संचालक (आत्मा) संभाजी ठाकुर यांनी दिली आहे.

पालकमंत्र्यांच्या हस्ते महोत्सवाचे होणार उद्घाटन

            या महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे शुभहस्ते व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती रंजनाताई पाटील यांचे अध्यक्षतेखाली होणार आहे. या कार्यक्रमास खासदार श्रीमती रक्षाताई खडसे, खासदार उन्मेश पाटील, जिल्हा परिषदेच्या कृषि सभापती श्रीमती उज्वलाताई माळके, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे आदि मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहणार आहेत.

महोत्सवात विविध रानभाज्या विक्रीसाठी राहणार

            मानवी आरोग्यामध्ये सकस अन्नाचे अन्न्यसाधारण महत्व आहे. सकस अन्नामध्ये विविध भाज्यांचा समावेश आवश्यक आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये रानातील म्हणजेच जंगलातील तसेच शेतशिवारातील नैसर्गिकरित्या उगवल्या जाणाऱ्या रानभाज्यांचे/रानफळांचे महत्व व आरोग्यविषयक माहिती सर्वसामान्य नागरिकांना होणे आवश्यक आहे. रानभाज्यांमध्ये विविध प्रकारचे शरीराला आवश्यक असणारे पौष्ठिक अन्नघटक असतात तसेच या रानभाज्या नैसर्गिकरित्या येत असल्यामुळे त्यावर रासायनिक किटकनाशक/बुरशीनाशक फवारणी करण्यात येत नाही. मानवी आरोग्यामध्ये रानभाज्या शरीराला आवश्यक असणारे अन्नघटक, जीवनसत्वे, खनिजे व औषधी गुणधर्माबाबत परिपूर्ण असतात. या रानभाज्यांची ओळख, आरोग्याच्या दृष्टिने त्यांचे महत्व, पाककृती इ. बाबत नागरीकांमध्ये जागृती व्हावी, त्यांना गोडी लागावी या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. त्याचबरोबर या भाज्यांची विक्री व्यवस्था वाढून त्या विक्रीतून शेतकऱ्यांनाही आर्थिक फायदा होईल. या महोत्सवा दरम्यान जिल्ह्यातील शेतकरी विविध रानभाज्या उदा. करटोली, आघाडा, पाथरी, घोळ, तांदळजा, कुर्डु, गुळवेल, शेवगा इ. विविध रानभाज्या विक्रीसाठी आणणार आहेत.

शेतकऱ्यांनी कृषि विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन

            रानभाजी महोत्सव तालुकास्तरावरही 9 ते 15 ऑगस्ट, 2021 या कालावधीत सप्ताह स्वरुपात राबविण्यात येणार आहे. तरी इच्छुक शेतकऱ्यांनी त्यांचेकडील उपलब्ध मालाच्या तपशीलासह प्रकल्प संचालक, आत्मा, जळगाव अथवा आपले तालुक्याचे तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा. तसेच जास्तीत जास्त नागरीकांनी या रानभाज्या महोत्सवात खरेदीचा आनंद घेऊन शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्प संचालक (आत्मा) संभाजी ठाकूर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने