*जळगावमध्ये शिवसैनिकांनी अडवला देवेंद्र फडणवीसांचा ताफा!!*
जळगाव दि. 2(प्रतिनिधी ) विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जळगाव दौऱ्यावर असून यावेळी शिवसैनिकांकडून त्यांचा ताफा अडवण्यात आला. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर व रावेर तालुक्यात मान्सूनपूर्व वादळी पावसाने थैमान घातलं होतं. यात केळी बागांसह घरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी शिवसैनिकांनी फडणवीसांचा ताफा अडवला.परिवर्तन चौकात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ताफा अडवत शेतकऱ्यांच्या केळी पीक विमाबाबत जाब विचारला. एकनाथ खडसे अनेक वर्ष भाजपाचे आमदार असतानाही कोणती विकासकामं केली नसल्याचा आरोप यावेळी कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. फडणवीसांसोबत यावेळी गिरीश महाजनदेखील उपस्थित होते.
वादळी वाऱ्यामुळे १८० घरं पडलेल्या मोदाळदे गावाची केली पाहणी
गेल्या आठवड्यात अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे मुक्ताईनगर तालुक्यातील मोदाळदे गावातील १८० घरं पडली आहेत. त्यामुळे सध्या गावातील नागरिक बेघर झाले आहेत. फडणवीसांना बेघर झालेल्या नागरिकांची भेट घेत शासनाकडून भरीव मदत मिळवून देण्याचं आश्वासन दिलं.