चोपडा शहरात होणारा पाणीपुरवठा शुद्धच : नगराध्यक्षा सौ.नम्रताताई पाटील ♦️पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पिण्याचे पाणी उकळून व गाळून प्यावे, ♦️धरणात पाणी साठा वाढल्याने पाणी धुरसट गढूळ

 चोपडा शहरात होणारा पाणीपुरवठा शुद्धच : नगराध्यक्षा सौ.नम्रताताई पाटील 

♦️पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पिण्याचे पाणी उकळून व गाळून प्यावे,

♦️धरणात पाणी साठा वाढल्याने पाणी धुरसट गढूळ 


चोपडा दि.13(प्रतिनिधी)शहरातील काही भागात गढ़ूळ अथवा धुरसट रंगाचे पाणी येत असल्याबाबत प्रसिद्ध झालेल्या वनाच्या पार्श्वभू‌मीवर नगरपरिषद प्रशासनाने नागरिकांना वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे.गेल्या काही दिवसांपासून परिसरात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे गुळ धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली होती, त्यामुळे  पाण्यात गढूळपणा व मातीचे प्रमाण वाढले होते, सदर पाण्यावर जलशुध्दीकरण केंद्रामध्ये आवश्यक त्या शुद्धीकरण प्रक्रियेद्वारे प्रक्रिया करूनच शहराला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तथापि, शुद्धीकरणानंतरही पाण्याचा रंग काही प्रमाणात भुरसट दिसून येत होता.नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाणी उकळून व गाळून पिण्याबाबत जनजागृती करण्यात आली असून, नगरपरिषदेमार्फत लाऊडस्पीकरद्वारे दवंडी देऊन नागरिकांना याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत अशी माहिती सौ.नगराध्यक्षा सौ.नम्रताताई पाटील यांनी दिली आहे.

त्या पुढे म्हणाल्या की,दरम्यान, धरणातील पाणी आता स्थिर (Settle) झाल्याने कच्च्या पाण्यातील गढूळपणा कमी झाला असून पाण्याचा रंग नेहमीप्रमाणे झाला आहे.पाणीपुरवठ्याच्या गुणवत्तेवर नगरपरिषद प्रशासनाकडून सातत्याने देखरेख ठेवण्यात येत असून वेळोवेळी ओ.टी. (O.T.) चाचणी करण्यात येत आहे. तसेच पिण्याच्या पाण्याचे नमुने निमितपणे, दर आठवड्याला, जिल्हा प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येतात. प्रयोगशाळेतील तपासणी अहवालानुसार पाण्याची गुणवत्ता योग्य असल्याचे निदर्शनास आले आहे.

नागरिकांनी पाण्याच्या रंगामध्ये तात्पुरता बदल झाल्याने घाबरून जाऊ नये. पाणीपुरवठ्याची गुणवत्ता व नागरिकांचे आरोग्य यास सर्वोच्च प्राधान्य देऊन आवश्यक त्या सर्व उपाययोजना नगरपरिषदेमार्फत करण्यात येत आहेत असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

चोपडा शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पिण्याचे पाणी उकळून व गाळून वापरावे तसेच पाण्याचा अपव्यय टाळावा, नगरपरिषदेमार्फत नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येत असून पाणीपुरवठ्याच्या गुणवत्तेवर सातत्याने देखरेख ठेवली जात आहे.

 *नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये मुख्याधिकारी* 

नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीसाठी नगरपरिषदेशी संपर्क साधावा. पाणीपुरवठ्याबाबत काही तक्रार अथवा अडचण असल्यास ती तात्काळ नगरपरिषदेकडे नोंदवावी. शहरातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे ही नगरपरिषदेची प्राथमिक जबाबदारी असून यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे असल्याचे   मुख्याधिकारी यांनी म्हटले आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने