“राजकारण नको, नागरिकांना शुद्ध पाणी हवे : सत्ताधारी गटाचे गटनेता पियुष चौधरी
चोपडा,दि.१३(प्रतिनिधी) : चोपडा शहरातील पाणीपुरवठ्याबाबत विरोधी गटाकडून करण्यात आलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर चोपडा नगरपरिषदेचे गटनेता तथा नगरसेवक पियुष चौधरी यांनी सत्ताधारी गटाची भूमिका स्पष्ट केली.
पावसाळ्यात जलस्रोतांमध्ये गाळ व मातीचे प्रमाण वाढल्याने काही वेळा पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. मात्र नागरिकांना सुरक्षित व शुद्ध पाणी मिळावे यासाठी नगरपरिषद प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना सातत्याने केल्या जात आहेत, असे पियुष चौधरी यांनी स्पष्ट केले.
“विरोधकांनी फिल्टर प्लांटची पाहणी केली, त्याचे आम्ही स्वागत करतो. मात्र केवळ पाहणी करून राजकीय आरोप करण्यापेक्षा पाण्याचे अधिकृत नमुने तपासून वस्तुस्थिती जनतेसमोर आणणे आवश्यक आहे,” असे त्यांनी सांगितले.
शहरातील पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांच्या तक्रारींची तातडीने दखल घेऊन आवश्यक त्या ठिकाणी पाण्याचे नमुने तपासणे, फिल्टर प्लांटची प्रक्रिया तपासणे, जलसाठ्यांची स्वच्छता आणि पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया अधिक प्रभावी करणे यावर नगरपरिषदेचा भर असल्याचे त्यांनी सांगितले.
“आम्ही सत्ताधारी आहोत आणि त्यामुळे आमच्यावर नागरिकांप्रती जबाबदारी आहे. कमतरता असेल तर ती मान्य करून ती दूर करण्याची जबाबदारीही आमचीच आहे. मात्र प्रयोगशाळेच्या अहवालाशिवाय पाणी ‘दूषित’ असल्याचे सांगून नागरिकांमध्ये भीती निर्माण करणे योग्य नाही,” अशी स्पष्ट भूमिका गटनेता पियुष चौधरी यांनी मांडली.
तसेच तपासणीत कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याची निष्काळजीपणा अथवा कर्तव्यात कसूर आढळल्यास नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी, यासाठी सत्ताधारी गट प्रशासनाकडे ठामपणे पाठपुरावा करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
“चोपडा शहरातील नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित पाणी मिळणे हा आमच्यासाठी राजकारणाचा विषय नाही, तर जबाबदारीचा विषय आहे. विरोधकांनी आरोप करावेत; आम्ही मात्र समस्येवर उपाय करून दाखवू,” असा विश्वास .पियुष राजेंद्र चौधरी यांनी व्यक्त केला
