माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विठूनामाच्या गजरात आणली नागलवाडीत पंढरी
चोपडा दि.२६(प्रतिनिधी): आषाढी एकादशीचे औचित्य साधून नागलवाडी गावात माध्यमिक विद्यालयाची ज्ञानदिंडी, पथनाट्य व रिंगण सोहळ्याने ग्रामस्थांचे वेधले लक्ष. त्या प्रसंगी गावातील ज्येष्ठ नागरिक श्री. धरमदास पाटील, श्री. प्रमोद सुरसिंग पाटील सपत्नीक, उपसरपंच श्री. सचिन पाटील, डॉ. पी. एन. महाजन, शाळेचे मुख्याध्यापक श्री. पी. डी. पाटील तसेच इतर मान्यवर व ग्रामस्थांच्या हस्ते ज्ञानदिंडीचे पूजन करण्यात आले. गावातील राम मंदिरापासून दिंडीला सुरुवात करण्यात आली, त्यात विठ्ठल रखुमाईच्या वेशभूषा, ग्रंथ व कलशधारी, वारकरी वेशभूषेतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी गावाकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. गावातील मुख्य चौकात ठिकठिकाणी स्वच्छता व शिक्षण या विषयावर पथनाट्य सादर करून जनजागृती करण्यात आली. दत्त मंदिर परिसरात फराळ वाटप करून दिंडीची सांगता करण्यात आली. या सोहळ्याचे उत्कृष्ट नियोजन शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक बंधू भगिनी तसेच लेखनिक कर्मचारी बंधू यांनी केले.
