जि.प. प्राथमिक केंद्रशाळा घोडगावच्या चार विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश
♦️कोमल समाधान चौधरी हिस 216 तर निरजा राजकमल कोळी हिस 194 गुण
चोपडा दि.२६(प्रतिनिधी)जि.प. प्राथमिक केंद्रशाळा, घोडगाव येथील इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षा 2025-26 मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत मराठी माध्यमातील शिक्षणाची गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. शाळेतील चार विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्र ठरले असून, या यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
यामध्ये कोमल समाधान चौधरी यांनी 216 गुण, निरजा राजकमल कोळी यांनी 194 गुण, सार्थक अभिमान कोळी यांनी 190 गुण, तर स्वामिनी सुनील वंडर यांनी 188 गुण मिळवून उल्लेखनीय यश मिळवले.
आज अनेक पालक इंग्रजी माध्यमाच्या शाळांना प्राधान्य देत असले, तरी ग्रामीण भागातील मराठी शाळांमधूनही गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते, याची ही यशस्वी कामगिरी साक्ष देत आहे. राज्यातील अनेक प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, शिक्षक, डॉक्टर, अभियंते आणि विविध क्षेत्रांत मोठे यश मिळवलेले अनेक मान्यवर हे मराठी शाळांमधूनच घडले आहेत. त्यामुळे भाषा नव्हे, तर विद्यार्थ्यांची जिद्द, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे संस्कार हेच यशाचे खरे आधारस्तंभ असल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद, पालक आणि ग्रामस्थ यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले असून, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. या यशामुळे घोडेगाव परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, मराठी शाळांविषयीचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
