आश्रम शाळा सत्रासेन येथे ग्रामीण पोलीस स्टेशनतर्फे कायदेविषयक जनजागृती व करिअर मार्गदर्शन कार्यक्रम

 आश्रम शाळा सत्रासेन येथे ग्रामीण पोलीस स्टेशनतर्फे कायदेविषयक जनजागृती व करिअर मार्गदर्शन कार्यक्रम

सत्रासेन ता. चोपडा,दि.२६(प्रतिनिधी) : धनाजी नाना प्राथमिक व डी.आर.बी. माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा, सत्रासेन येथे ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी कायदेविषयक जनजागृती, महिला व बाल सुरक्षा, सायबर सुरक्षा आणि करिअर मार्गदर्शन या विषयांवर विशेष मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमासाठी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक (PSI) श्री. एम. व्ही. मोरे, पोलीस कर्मचारी श्री. आर. डी. पाटील, श्रीमती आर. एच. शिरसाठ मॅडम तसेच श्री. ए. आर. अहिरे उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना श्री. मोरे यांनी विद्यार्थ्यांना कायद्याचे पालन, सामाजिक जबाबदारी आणि नागरिक म्हणून कर्तव्यांची जाणीव करून दिली. त्यांनी विविध प्रकारच्या गुन्ह्यांची माहिती देताना सायबर गुन्हे, ऑनलाइन आर्थिक फसवणूक, सोशल मीडियावरील गैरवापर, महिला व बालकांवरील अत्याचार, छेडछाड, बालविवाह, बालमजुरी, बाललैंगिक अत्याचार (POCSO कायदा), रॅगिंग, अमली पदार्थांचे दुष्परिणाम, मारामारी, चोरी, वाहतूक नियमांचे उल्लंघन, मोबाईलचा गैरवापर, अफवा पसरविणे, ब्लॅकमेलिंग, ओळख चोरी, रस्ते अपघातास कारणीभूत ठरणारे निष्काळजी वाहनचालक व इतर कायद्याने दंडनीय कृत्ये यांचे स्वरूप सविस्तर स्पष्ट केले.

तसेच गुन्हे टाळण्यासाठी आवश्यक असलेली दक्षता, अनोळखी व्यक्तींशी सावधगिरी, ऑनलाइन व्यवहार करताना घ्यावयाची काळजी, आपत्कालीन परिस्थितीत त्वरित पोलिसांशी संपर्क साधण्याचे महत्त्व आणि पोलीस हे समाजाचे मित्र असून त्यांच्याबद्दल भीती न बाळगता विश्वासाने सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

यावेळी अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना पोलीस दल, स्पर्धा परीक्षा, शासकीय सेवांमधील करिअरच्या संधी, यशस्वी होण्यासाठी आवश्यक नियोजन, नियमित अभ्यास, शिस्त, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन याविषयीही प्रेरणादायी मार्गदर्शन करण्यात आले.या कार्यक्रमाला धनाजी नाना आदिवासी सेवा मंडळ, सत्रासेनचे अध्यक्ष श्री. रवींद्र रायसिंग भादले व सचिव श्री. ज्ञानेश्वर रायसिंग भादले यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन लाभले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. डी. पी. पावरा, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. वंदना पावरा यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन श्री. भालचंद्र पवार यांनी केले.


या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये कायद्याविषयी जागरूकता निर्माण झाली, गुन्हेगारीपासून दूर राहण्याची प्रेरणा मिळाली तसेच स्पर्धा परीक्षा व शासकीय सेवांमधील करिअरच्या संधींबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन लाभल्याने विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने