गुरुकुल नगरात लोखंडी विद्युत पोलला करंट ; गाईचा जागीच मृत्यू ♦️महावितरणच्या कार्यपद्धतीवर नागरिकांचा संताप; तीन तासांनी पंचनामा, आठ दिवसांत पोल हटविण्याचे आश्वासन

 गुरुकुल नगरात लोखंडी विद्युत पोलला करंट ; गाईचा जागीच मृत्यू

♦️महावितरणच्या कार्यपद्धतीवर नागरिकांचा संताप; तीन तासांनी पंचनामा, आठ दिवसांत पोल हटविण्याचे आश्वासन

चोपडा,दि.८ (प्रतिनिधी ):चोपडा शहरातील गुरुकुल नगर परिसरात पाण्याच्या टाकीजवळ उभारण्यात आलेल्या लोखंडी विद्युत पोलमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने एका गाईचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून महावितरणच्या निष्काळजीपणाविरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुकुल नगर येथील रहिवासी सुनील नामदेव पाटील उर्फ ‘गॅरेजवाले मामा’ यांच्या मालकीची गाय परिसरातील रस्त्याच्या मधोमध उभारण्यात आलेल्या लोखंडी विद्युत पोलच्या संपर्कात आली. पोलमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने गाईला जोरदार करंट बसला आणि तिचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच परिसरातील महिला, पुरुष व नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. गाईचा मृत्यू झाल्याने मालक सुनील पाटील व त्यांच्या पत्नी यांना मोठा धक्का बसला असून त्यांचा आक्रोश पाहून उपस्थितांनाही हळहळ वाटली.

नागरिकांनी महावितरणच्या दुर्लक्षामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप केला. संबंधित भागात विद्युत यंत्रणेची नियमित देखभाल होत नसल्याने तसेच कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने अशा घटना घडण्याची शक्यता वाढल्याचे नागरिकांनी सांगितले. यावेळी संतप्त रहिवाशांनी धोकादायक विद्युत पोल तातडीने हटविण्याची मागणी केली.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर महावितरणचे अधिकारी तुषार कापगते यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मात्र, दुर्घटनेनंतर सुमारे तीन तासांनी अधिकारी घटनास्थळी पोहोचल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. अधिकाऱ्यांनी मृत गाईचा पंचनामा करून नागरिकांशी चर्चा केली.

यावेळी संबंधित लोखंडी विद्युत पोल धोकादायक असल्याची दखल घेत तो येत्या आठ दिवसांत हटवून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. तसेच मृत गाईच्या नुकसानीबाबतचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवून आवश्यक ती पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.या घटनेमुळे गुरुकुल नगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून विद्युत पोल, तारां व इतर यंत्रणांची तातडीने तपासणी करून अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने