अमळनेर धुळे रस्त्यावर भीषण अपघात, 6 जणांचा जागीच मृत्यू

 

अमळनेर धुळे रस्त्यावर भीषण अपघात, 6 जणांचा जागीच मृत्यू 


अमळनेर दि.९( प्रतिनिधी) अमळनेर - धुळे महामार्गावर मंगरूळ गावाजवळ आज सकाळी अत्यंत भीषण तिहेरी अपघात घडला. कार, मोटर सायकल आणि एसटी बस यांच्यात झालेल्या या विचित्र अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून वाहनांचा चक्काचूर झाला आहे.

          याबाबत माहिती अशी की आज सकाळी सात वाजेच्या सुमारास मंगरूळ गावाच्या पुढे असलेल्या हॉटेल वृंदावन जवळ हा अपघात झाला. अमळनेर कडून धुळ्याच्या दिशेने मोटर सायकल आणि एसटी बस जात होत्या. याच वेळी धुळ्याकडून येणाऱ्या एका भरधाव कार वरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे समोरून येणाऱ्या एसटी बस आणि मोटरसायकलला कारने जोरदार धडक दिली. यात मोटरसायकलचा पूर्णपणे चेंदा मेंदा झाला असून चालक धरणगाव येथील रहिवासी आहे त्याच्या जागीच मृत्यू झाला. तर कार मधील पाच प्रवासांचाही जागीच मृत्यू झाला आहे. हे सर्व गुजरात मधील व्यारा येथील रहिवासी असून एकाच कुटुंबातील आहेत. ते सर्वजण अमळनेर येथे साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी जात असल्याची माहिती मिळाली. मात्र या अपघातात कारमधील एका लहान मुलाला जीवदान मिळाले असून स्थानिक ग्रामस्थ, पोलीस आणि एसटी कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे या लहान मुलाला कारमधून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले तर बसमधील एक प्रवासी जखमी असून त्यांच्या उपचार सुरू आहेत.

             अपघाताची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, हेड कॉन्स्टेबल कैलास शिंदे, रवी पाटील, पोलीस पाटील भागवत पाटील यांनी तातडीने मदत कार्य सुरू केले 

              दरम्यान या घटनेमुळे परिसरात प्रचंड शोक कळा पसरली आहे. काही काळ रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती तसेच बघ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने