कान्हादेशचा निसर्गरम्य "चौगावचा किल्ला"

 कान्हादेशचा निसर्गरम्य "चौगावचा किल्ला" 

चोपडा दि.२१(प्रतिनिधी) चौगाव किल्ला म्हणजेच गवळी राज्यांचा किल्ला हा बाराव्या शतकात उत्तर भारतात जाण्यासाठी असलेल्या भैरव घाटावर लक्ष ठेवण्यासाठी जवोजी गवळी व गोवाजी गवळी (अहिर राजे) यांच्या काळात सुमारे सत्तावीस एकर जमीनीवर बांधला गेला.सन १८१८ व १८८० च्या ब्रिटिश कालीन गॅझेट नुसार त्या काळी हा किल्ला बांधण्यासाठी दोन लाख रुपये खर्च आल्याची नोंद आहे.पण विशेष म्हणजे या किल्ल्यावर असलेल्या लेण्या ह्या सातवाहन कालीन म्हणजे दोन हजार वर्षांपूर्वीच्या आहेत.या किल्ल्यावर दोन दरवाजे एक पुर्वाभिमुख व दुसरा उत्तराभिमुख या किल्ल्यावर काही ठिकाणी बाधिव तर काही ठिकाणी दगडाची तासीव अशी तटबंदी आहे.अनेक बुरुज, भुयारी मार्ग आहेत.त्यातच वैशिष्ट्य पुर्ण असा सुमारे दहा गुंठ्यांत बांधण्यात आलेला गवळी वाडा आजही सुस्थितीत आहे.त्याच्यात खोल्या,देवळी व विटांचे नक्षीकाम असे आहे.जवळच सप्ततलावांचा समुह आहे.ते गाळ मातीने पुर्ण भरलेले होते.पण अनेक दुर्ग संवर्धन करणाऱ्या संघटना उदाहरणार्थ राजा शिवछत्रपती परीवार, ऐतिहासिक वारसा संवर्धन व कृती समिती, छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान,टिम खान्देश एक्सप्लोरर व चौगाव किल्ला संवर्धन समिती या संघटनांनी सात पैकी चार तलाव स्वच्छ केले आहेत.आता तिथे बारमाही पाणी असते आणि सुंदर कमळं उमललेली असतात.तसेच बाजूला क्षतिग्रस्त झालेले मंदिर आहे.किल्ल्याची थोडक्यात चतुर्सिमा सांगायची म्हटली म्हणजे पुर्वेला भैरवघाट पश्चिमेला राणी काजल समाधीस्थळ व जिल्ह्यातील सर्वात मोठा व आकर्षक धबधबा, उत्तरेला फतर्या मारूती आणि दक्षिणेला तिर्थक्षेत्र त्रिवेणी महादेव मंदिर.किल्ल्याच्या पायथ्याशी अनेक समाधीस्थळे, वीरगळ व नुकतेच सापडलेले हेमाडपंथी मंदिराचे अनेक अवशेष आहेत.यावरूण किल्ल्याच्या पायथ्याशी पण एक हेमाडपंथी मंदिर असावे.व वीरगळ म्हणजे गुरे चारतांना किंवा युद्धात मारले गेलेल्यांचे ते मुर्तीरूपी स्मारक होत.तसेच समाधीस्थळांवरून हा किल्ला फक्त टेहळणीसाठी नव्हे तर येथे बराच काळ सैनिक व राज्यांचे अस्तित्व होते म्हणजे रहिवास होता हे सिद्ध होते.सन १९७८ मध्ये येथे सहा फूट लांबीच्या तोफा सापडल्या असून त्या चोपडा सुरक्षिततेच्या कारणास्तव तहसीलला ठेवल्या आहेत.

 या किल्ल्याची नोंद सन १८१८,१८८० या ब्रिटिश कालीन गॅझेटिअरमध्ये तसेच महाराष्ट्र राज्य जळगाव जिल्हा गॅझेट मध्ये गवळी राज्यांचा किल्ला म्हणून आहे.तसेच पुरातत्व विभागाचे इतिहास संशोधक भुजुंगराव बोबडे ,चौगाव वन व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष विश्राम तेले चौगाव,स्थानिक इतिहास अभ्यासक डाॅ.गोपाल पाटील व प्रा.पंकज शिंदे यांनी चौगाव किल्ल्यावर असलेल्या सातवाहन कालीन लेणींचा शोध घेतला तसेच उत्तर मराठा राजवटीतील कोणशिलेचा शोध घेतला आणि तसा अभ्यास पुर्वक अहवाल १४ मार्च २०२१ ला तत्कालीन पुरातत्व विभागाचे अधिकारी श्री गर्गे साहेब व तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना सादर केला आहे.दुर्दैव म्हणजे किमान शंभर वर्षांपूर्वी वास्तुला राज्य संरक्षित स्मारक घोषित केले जाते पण चौगाव किल्ल्यावर दोन हजार वर्षांपूर्वीच्या लेण्या असतांना या स्थळाची अद्याप पुरातत्व विभागात नोंद झाली नाही किंवा या किल्ल्याला राज्य संरक्षित स्मारक घोषित केले गेले नाही.पुरातत्व विभाग वन विभागाची अडचण दाखवतं तर वन विभाग पुरातत्व खात्याची अडचण दाखवत.खरं म्हणजे साल्हेर, मुल्हेर हे किल्ले पण वन विभागात आहेत त्यांना राज्य संरक्षित स्मारक घोषित केले गेले त्याच धर्तीवर चौगाव किल्ला पण राज्य संरक्षित स्मारक घोषित होणे गरजेचे आहे.कारण तसं झालं नाही तर लवकरच किल्ल्यावरील अवशेष हे ऊन वारा व पाऊस मुळे झीज होऊन नष्ट होतील.

 पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष व किल्ला वनविभागाच्या हद्दीत येत असल्यामुळे आणि त्यांच्या कठोर कायद्यांमुळे किंवा वन विभागाच्या परवानगी अभावी ह्या किल्ल्याला अद्याप राज्य पर्यटनाचा दर्जा मिळालेला नाही.खरं म्हणजे किल्ल्याजवळीच तिर्थक्षेत्र त्रिवेणी महादेव मंदिराला सन २०१० पासूनच तिर्थक्षेत्राचा क दर्जा मिळाला आहे.त्यामुळे येथे मुलभूत सुविधांचा अभाव असूनही दर वर्षी वर्षभरातून एक लाख ते सव्वा लाख पर्यटक येत असतात.पावसाळ्या याठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात, विशेष करून श्रावण महिन्यात,दिवाळी, नवरात्र, हरतालिका व महाशिवरात्री मध्ये येथे यात्रेचे स्वरूप असते.भविष्यात या ठिकाणी ऐतिहासिक किल्ला, तिर्थक्षेत्र त्रिवेणी महादेव मंदिर, जिल्ह्यातील उंच धबधबा व निसर्गरम्य वातावरणामुळे ऐतिहासिक, धार्मिक, नैसर्गिक पर्यटन स्थळ होऊन या आदिवासी बहुल भागात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.म्हणून या किल्ल्याला त्वरित राज्य संरक्षित स्मारक घोषित करण्यात यावे व राज्य पर्यटनाचा "ब" दर्जा मिळावा जेणेकरून मोठा निधी उपलब्ध होऊन पर्यटन स्थळाचा विकास होऊन रोजगार निर्मिती होईल अशी मागणी चोपडा जळगाव सहीत संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातून जोर धरत आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने