स्व.अजितदादा पवार जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताहात राष्ट्रवादीचा 'हरित महायज्ञ'
♦️चोपडा पीपल्स बँक देणार रोपे ; एक लाख वृक्ष लागवडचा संकल्प!
चोपडा,दि.२८(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त २२ ते २९ जुलैदरम्यान साजऱ्या होत असलेल्या जनसेवा सप्ताहानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चोपडा तालुक्यात एक लाख वृक्ष लागवड व संवर्धनाचा महत्त्वाकांक्षी संकल्प जाहीर केला आहे. पर्यावरण संवर्धन आणि 'हरित चोपडा' घडविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम चोपडा पीपल्स बँक व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार आहे.या अभियानासाठी लागणाऱ्या विविध प्रजातींच्या वृक्षांची रोपे चोपडा पीपल्स बँकेमार्फत उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे चोपडा पीपल बँकेचे चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी यांनी जाहीर केले.वृक्ष लागवडीनंतर एक लाख वृक्षांचे संगोपन व संवर्धन करण्याची संपूर्ण जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वीकारली असल्याची माहिती तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी दिली.
यासाठी गावनिहाय नियोजन करण्यात येणार असून, सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून लागवडीची ठिकाणे, रोपांचे वितरण तसेच संवर्धनाचा सविस्तर आराखडा निश्चित केला जाणार आहे. केवळ वृक्षारोपण न करता प्रत्येक रोप जगविण्यावर विशेष भर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.पर्यावरण संरक्षणाला लोकचळवळीचे स्वरूप देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणारा हा उपक्रम चोपडा तालुक्यासाठी एक आदर्श ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.यावेळी चोपडा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक, महिला तसेच पर्यावरणप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन अभियान यशस्वी करावे, असे आवाहन विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुनभाई गुजराती यांच्या प्रेरणेने,चोपडा पीपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी,व्हा चेअरमन सुनीलभाऊ जैन,संचालक नेमिचंद जैन, सर्व संचालक मंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चोपडा तालुका यांनी केले.
*ठळक मुद्दे*
• जनसेवा सप्ताहानिमित्त एक लाख वृक्ष लागवड व संवर्धनाचा संकल्प.
• चोपडा पीपल्स बँकेकडून विविध प्रजातींची रोपे उपलब्ध.
• राष्ट्रवादी काँग्रेसकडून वृक्ष संगोपनाची जबाबदारी.
• गावनिहाय नियोजन करून पर्यावरण संवर्धनाची व्यापक जनचळवळ उभारणार.
