हिंदू मुलींनो सावध व्हा, ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात अडकू नका : ह.भ.प. योगीराज महाराज चिंचोलीकर
♦️निमगव्हाणला श्री.धुनिवाले दादाजी मंदिरात विराट हिंदू संमेलन
चोपडा,दि.24(प्रतिनिधी) - हिंदू मुलींनो, लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकू नका, आपल्या धर्माचा, संस्कृतीचा अभिमान ठेवा, असे आवाहन ह.भ.प.योगीराज महाराज चिंचोलीकर यांनी केले.निमगव्हाण ता.चोपडा येथील तीर्थक्षेत्र श्री.धुनिवाले दादाजी मंदिराच्या प्रांगणात तापी परिसर सकल हिंदू समाजाच्या वतीने विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.
संमेलनाच्या अध्यक्षस्थानी शिव मंदिर पांजरिया धाम वरला (म.प्र.) येथील गुरुदेव कालुसिंग बाबा हे होते. यावेळी व्यासपीठावर ह.भ.प.योगीराज महाराज, प्रमुख वक्ते तथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्व प्रचारक सौरभ नेवे, विश्व हिंदू परिषदेचे प्रचारक ह.भ.प. भीमाशंकर गोस्वामी (नांदेड) आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना ह.भ.प.योगीराज महाराज यांनी, धर्म आणि शिवरायांच्या प्रेरणेने कार्य करणे आवश्यक असून, लव्ह जिहाद यांसारख्या कटकारस्थानांना थोपवण्यासाठी आता प्रत्येक हिंदूने जागृत व्हायला हवे. एकजूट ही आपली ताकद आहे, असे सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संत महंतांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले.
नंतर संत महंतांचा तापी परिसर सकल हिंदू समाजाच्या वतीने तापीमाई ग्रंथ व पुष्पहार अर्पण करून सत्कार करण्यात आला.
संमेलनाच्या निमित्ताने सकाळी काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रा व सायंकाळी निघालेल्या मोटार सायकल रॅलीने संपूर्ण निमगव्हाण नगरी भगव्या रंगात न्हाऊन निघाली.
तसेच जय श्री राम !, भारत माता की जय !, वंदे मातरम् !, या घोषणांनी निघालेल्या मिरवणुकीने गाव दणाणून सोडले.
आरंभी संमेलनात प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्व प्रचारक सौरभ नेवे यांनी मार्गदर्शन केले, त्यात त्यांनी आपल्या प्रभावी भाषणातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना, कार्यपद्धती व आजपर्यंतचे योगदान यावर सविस्तर प्रकाश टाकला, १९२५ मध्ये स्थापन झालेल्या संघाने समाज संघटन, संस्कार व राष्ट्रनिर्माणाच्या दिशेने केलेल्या कार्याचा त्यांनी उल्लेख केला.
तद्नंतर कार्यक्रमास उपस्थित सर्वांना आयोजन समितीच्या वतीने हनुमान चालीसा पुस्तिकेचे वाटप करण्यात आले व कार्यक्रमाच्या शेवटी ह.भ.प. योगीराज महाराज यांच्यासह सर्वांनी सामूहिकरित्या हनुमान चालीसाचे पठण करून एकतेचा संदेश दिला.
संमेलनादरम्यान देशभक्तीपर गीत गायन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि दोंदवाडे गावातील व निमगव्हाण जिल्हा परिषद शाळेतील बाल गोपाल विद्यार्थ्यांनी प्रभू श्री राम, लक्ष्मण, सीता माता, छत्रपती शिवाजी महाराज, भारत माता, बाल हनुमान, महाराणी ताराबाई, राणी लक्ष्मीबाई यांच्या सजीव भूमिका साकारल्या होत्या या विविध उपक्रमांनी वातावरण भारावून गेले होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तापी परिसरातील निमगव्हाण, तांदलवाडी, दोंदवाडे, खाचणे, तावसे, कुरवेल, गरताड, धनवाडी, महारेहोळ, सावखेडा, मुंगसे, रुंधाटी, मटगव्हाण, नारखेडा या गावातील स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.
विराट हिंदू संमेलनास शेकडो माता - भगिनी, युवक व वृद्ध नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमानंतर सर्वांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.
