चोपड्यात मोठ्ठी कारवाई..!चुंचाळे गावी साडे पाच लाखांचे प्रतिबंधित 'एचटीबीटी कापुस' बियाणे जप्त..
♦️संशयित बियाणे विक्रेत्याविरुद्ध कृषी व पोलिसांची संयुक्तिक धडक कारवाई
चोपडा,दि.24(प्रतिनिधी): तालुक्यात चुंचाळे येथे कृषी विभाग आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तरीत्या मोठी कारवाई करत सुमारे ५.३५ लाखांचे प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाणे जप्त केले आहे. या प्रकरणी कृषी अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरुन संशयित बियाणे विक्रेत्याविरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चुंचाळे येथील नितीन नंदलाल चौधरी ही व्यक्ती स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी छुप्या पद्धतीने प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाण्यांची विक्री करत असल्याची माहिती चोपडा
शहर पोलीस ठाण्याला एका निनावी पत्राद्वारे मिळाली होती. त्याची खात्री करण्यासाठी कृषी विभागाने तातडीने हालचाल करत तपासणी मोहीम राबवली. संबंधित ठिकाणी छापा टाकून पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात संशयित बियाण्यांचा साठा आढळून आला. कारवाईदरम्यान रिसर्च हायब्रीड कॉटन सीड सुपर किंग आणि चॅलेंजर या नावाने विक्रीसाठी ठेवलेली प्रत्येकी ४५० ग्रॅम वजनाची सुमारे ४५० पाकिटे म्हणजेच ९ पोती बियाणे जप्त करण्यात आली. प्राथमिक तपासात सदरचे बियाणे एचटीबीटी प्रकारातील असून शासनाने त्यावर स्पष्ट बंदी घातलेली असल्याचे निष्पन्न झाले. संशयिताकडून जप्त करण्यात आलेल्या बियाण्याची अंदाजे किंमत सुमारे ५ लाख ३५ हजार रुपये इतकी नोंदविण्यात आली आहे. या प्रकरणी नितीन चौधरी (रा. चुंचाळे, ता. चोपडा, जि. जळगाव) याच्याविरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक सुनील बोरकर, कृषी सहसंचालक सुभाष काटकर, मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी प्रविण देशमुख, जळगावचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी, कृषी विकास अधिकारी पद्मनाथ मस्के तसेच नाशिकचे तंत्र अधिकारी (गुणनियंत्रण) उल्हास ठाकुर यांच्या मार्गदर्शनामुळे ही कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण झाली. दरम्यान, कृषी विभागाने शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा देत केवळ प्रमाणित व शासनमान्य कापूस बियाण्यांचाच वापर करण्याचे आवाहन केले आहे. अनधिकृत व प्रतिबंधित बियाण्यांच्या वापरामुळे उत्पादनात घट येऊ शकते, तसेच पर्यावरण व जमिनीच्या सुपीकतेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
