चोपड्यात दगडाने ठेचून तरुणाची हत्या; धरणगाव नाक्याजवळ फेकला मृतदेह ​ ♦️ खिशातील लग्नपत्रिकेमुळे तारामती नगरातील प्रदीप माळी नामक युवक असल्याची ओळख पटली ♦️कुत्र्यांनी अक्षरक्षा: लचके तोडल्याने चेहरा विद्रुप

 चोपड्यात दगडाने ठेचून तरुणाची हत्या; धरणगाव नाक्याजवळ फेकला मृतदेह ​

♦️ खिशातील लग्नपत्रिकेमुळे तारामती नगरातील प्रदीप माळी नामक युवक असल्याची ओळख पटली 

♦️कुत्र्यांनी अक्षरक्षा: लचके तोडल्याने चेहरा विद्रुप 


चोपडा,दि.२०(प्रतिनिधी) : शहरातील नारायणवाडी परिसरातील धरणगाव नाक्याजवळ सोमवारी सकाळी एका ४० ते ४५ वर्षीय व्यक्तीचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. मृताचा गळा कापून अथवा  दगडाने ठेचून त्याची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, मृताच्या खिशात मिळालेल्या एका लग्नपत्रिकेवरून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता, सदर मृतदेह तारामती नगर येथील रहिवासी प्रदीप राजू माळी यांचा असल्याचे निष्पन्न झाला आहे. ​काही दिवसांपूर्वी झालेले  कीरकोळ वाद? का दारुच्या नशेत हे हत्याकांड झाले याबाबत कोणताही  धागा पोलिसांना गवसला  नसल्याने प्रकरणाचा गुंता वाढलाआहे.त्यामुळे बातमी लिहीपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. 

याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी धरणगाव नाक्याजवळ एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पडलेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने धाव घेतली असता, मृताच्या गळ्यावर वार केल्याचे दिसून आले. सुरुवातीला या व्यक्तीची ओळख पटत नव्हती, ज्यामुळे पोलिसांसमोर तपासाचे आव्हान उभे राहिले होते. मात्र, मृतदेहाची झडती घेतली असता पोलिसांना त्यांच्या खिशात एक लग्नपत्रिका सापडली. या पत्रिकेवरील पत्ता आणि माहितीच्या आधारे पोलिसांनी शोध घेतला असता, मृत व्यक्ती तारामती नगरातील प्रदीप माळी असल्याचे समोर आले. ​फॉरेन्सिक टीमकडून तपासणी:- घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. गुन्ह्याचा तपास करण्यासाठी जळगाव येथून फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले होते. या पथकाने घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. खून नक्की कोणत्या कारणातून झाला आणि यात कोणाचा हात आहे, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.त्यानंतर अतिरिक्त पोलिस अधीक्षक चाळीसगाव परिमंडळ कविता नेरकर यांनी ही घटना स्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली असून त्या चोपडा येथे ठाण मांडून आहेत. ​ प्रदीप माळी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण आणि वेळ स्पष्ट होणार आहे. पोलिस अधिकाऱ्यांच्या मदतीने पोलीस कॉन्स्टेबल या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. भरवस्तीच्या जवळ अशा प्रकारे गळा कापून मृतदेह फेकून दिल्याच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. एक संशयित आरोपी पोलिसांच्या हाती लागल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

दरम्यान  प्रदीप माळी हा कष्टाळू युवक असल्याची माहिती समोर आली त्याने  किराणा दुकान व नामांकित जिन मध्ये देखील काम केलेले आहे. आता तो छोटीशी  टपरी टाकून जीवनचरितार्थ भागवत होता. मात्र रात्री हुडको कॉलनीतून अन्य  दोघांबरोबर बाहेर गेल्याचे समजते.  त्याचा "खून का झाला" हे मात्र गुलदस्त्यात आहे. दरम्यान संशयितांना ताब्यात घेतल्याशिवाय आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे नातलगांनी म्हटले आहे. आम्हाला न्याय न मिळाल्यास आम्ही मृतदेहाला हात देखील लावणार नसून ठिय्या आंदोलन करणार असल्याचे म्हटले आहे.

पोलिस निरीक्षक पवन देसले यांच्याशी संपर्क साधला असता घटनेचा तपास सुरू असून अधिकृत माहिती प्राप्त झाल्यानंतर गुन्हा नोंदवण्यात येईल असे स्पष्ट केले. पोलीस यंत्रणा जोमाने कामाला लागली असून विविध पुरावा गोळा करण्याचे काम युद्ध पातळीवर तपास सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.मतृदेह शव विच्छेदनासाठी जिल्हा पातळीवर पाठविण्यात आला असून सायंकाळपर्यंत पोलिस ठाण्यात अधिकृत माहिती प्राप्त होऊ शकली नाही.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने