लासुर येथील भगिनींच्या हाताच्या चपात्यांचा स्वाद आर्वी भंडाऱ्यात चाखला भक्तांनी
चोपडा दि.२८(प्रतिनिधी) : तालुक्यातील लासूर येथील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्त आयोजित महाप्रसाद कार्यक्रम हा केवळ एक सोहळा नव्हता, तर तो सेवाभाव, भक्ती आणि मानवतेचा सुंदर संगम झाल्याची भावना भाविक भक्तांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
या महाप्रसादातून उरलेल्या महाप्रसादाचे अत्यंत सद्भावनेने श्री १००८ महामंडलेश्वर महात्यागी प.पू शिवचरणदास बाबाजी यांच्या प्रेरणेने नियोजन करत ते सप्तशृंगी माता वणी गड पदयात्रेला निघालेल्या भाविकांसाठी आर्वी येथील रोकड बालाजी हनुमान मंदिर भंडाऱ्यात अर्पण करण्यात आला. भाविकांच्या सेवेत हे अन्न अर्पण करताना “अन्नदान हेच श्रेष्ठ दान” याची खरी प्रचिती आली.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, या महाप्रसादासाठी लागणाऱ्या चपात्या लासूर येथील महिला भगिनींनी आपल्या घरातून प्रेमाने व श्रद्धेने बनवून आणल्या. त्यांच्या या निस्वार्थ सेवेने संपूर्ण उपक्रमाला एक वेगळीच पवित्रता प्राप्त झाली या सेवाभावी कार्यात सहभागी झालेल्या प्रत्येक हाताचे भाविक भक्तांनी आभार व्यक्त केले आहेत.
