दप्तराच्या ओझ्यासोबत मनाचा ताणही होणार हलका..विरवाडे विद्यालयात आत्मजागृती ध्यान कक्ष सुरू
चोपडादि.२७ (प्रतिनिधी):विद्यार्थ्यांमध्ये वाढता मानसिक ताण कमी व्हावा आणि त्यांची एकाग्रता वृद्धिंगत व्हावी, या उदात्त हेतूने विद्या भारती माध्यमिक विद्यालय, विरवाडे (ता. चोपडा) येथे 'आत्मजागृती ध्यान कक्ष' या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील एका माध्यमिक विद्यालयाने राबवलेल्या या आदर्श उपक्रमाचे शैक्षणिक क्षेत्रात सर्वत्र कौतुक होत आहे.
मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन
या ध्यान केंद्राचे शानदार उद्घाटन विद्याभारती बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष श्री. पंडित सिंधु कोळी व सचिव श्री. दीपक रामदास सिसोदिया यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी शाळेच्या या नाविन्यपूर्ण प्रयत्नांचे कौतुक करत विद्यार्थ्यांना ध्यानाचे महत्त्व पटवून दिले.
संकल्पना व नियोजन
मुख्याध्यापक श्री. एस. एल. पाटील सर आणि योग शिक्षक श्री. डी. एस. पाटील सर यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनेतून या कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ पुस्तकी शिक्षण पुरेसे नसून, त्यांना मानसिक शांतता मिळणेही तितकेच आवश्यक आहे, या विचारातून हा कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.
उपक्रमाची वैशिष्ट्ये:
वेळापत्रक: विद्यार्थ्यांना दररोज सकाळी शाळा सुरू होण्यापूर्वी, तसेच दिवसातील 'ऑफ तास' किंवा 'बुलेटिन तासा'ला या कक्षात ध्यान करण्याची मुभा देण्यात आली आहे.
उद्देश: अभ्यासाचा ताण कमी करणे, स्मरणशक्ती वाढवणे आणि विद्यार्थ्यांमध्ये शिस्त निर्माण करणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
सहकार्य : हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अनमोल सहकार्य लाभले आहे.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण असून, पालकांनीही शाळेच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.
