पंकज विद्यालयात चिमुकल्यांच्या सादरीकरणातून मराठी भाषेचा जयघोष

 पंकज विद्यालयात चिमुकल्यांच्या सादरीकरणातून मराठी भाषेचा जयघोष

चोपडादि.२७(प्रतिनिधी) - पंकज प्राथमिक विद्यालयात   मराठी भाषा गौरव दिन अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश बोरोले यांनी मनःपूर्वक शुभेच्छा देत मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्वांना प्रेरित केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अरुण मोरे उपस्थित होते.

ज्ञान, संस्कार आणि संस्कृतीचा दीप प्रज्वलित करत ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्या साहित्यकृतींच्या स्मरणाने वातावरण मराठी अभिमानाने भारावून गेले.

कार्यक्रमाची सुरुवात साने गुरुजी यांच्या मंगलमय प्रार्थनेने झाली. त्यानंतर कुसुमाग्रज यांचा जीवन परिचय,अभंग, भजन, नृत्य , कविता गायन आणि महाराष्ट्र गौरव गीत यांच्या सुमधुर सादरीकरणाने सभागृह दुमदुमून गेले. इयत्ता चौथीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या सादरीकरणातून मराठी संस्कृतीचे रंग उधळले. चित्र रेखाटन उपक्रमात विद्यार्थ्यांनी संतपरंपरा, महाराष्ट्राचा इतिहास आणि मातृभाषेचे महत्त्व यांचे मनोहारी चित्रण साकारले.

विद्यार्थ्यांनी विविध महान मराठी व्यक्तिमत्त्वांची वेशभूषा परिधान करून कार्यक्रमात जणू इतिहास सजीव केला. त्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वर्गशिक्षक दिलीप जैस्वाल, मनोज अहिरे आणि विजय राठोड यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. इतर शिक्षक वृंद व दिलीप बाविस्कर, कैलास बोरसे, किशोर पाटील, रविंद्र शार्दुल, प्रमोद पाटील या कर्मचाऱ्यांचे सहकार्य कार्यक्रमाच्या प्रत्येक टप्प्यावर लाभले.

अध्यक्ष डॉ. अरुण मोरे यांनी आपल्या प्रेरणादायी मनोगतातून मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून संस्कारांची शिदोरी आहे, असे प्रतिपादन केले. शेवटी सर्वांनी मराठी भाषा जपू, वाढवू आणि तिचा अभिमान बाळगू असा सामूहिक संकल्प केला.

मराठी भाषा गौरव दिनाचा हा सोहळा  सूत्रसंचालन दिलीप जैस्वाल यांनी केले.विद्यालयाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदला जाईल  असा अविस्मरणीय ठरला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने