पंकज विद्यालयात कॉपीमुक्त परीक्षेच्या संकल्पासह इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांना निरोप
चोपडादि.१९(प्रतिनिधी) : - येथील पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ नुकताच पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संस्था उपाध्यक्ष अविनाश राणे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. आधार पानपाटील सर उपस्थित होते
तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी करीअरच्या आधुनिक वाटा निवडून स्वतःची व राष्ट्राची प्रगती साधावी असे प्रतिपादन श्री आधार पानपाटील तज्ञ मार्गदर्शक यांनी पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या इ.10 वी च्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभात केले. त्याच बरोबर फक्त डॉक्टर आणि इंजिनिअरिंग सोडून इतर कितीतरी करिअर च्या वाटा आहेत, त्यांचा सर्वांनी विचार करावा , इयत्ता 10 वी ची परीक्षा म्हणजे अंतिम परीक्षा नसून जीवनातील अनेक परिक्षांपैकी एक आहे असे कथन करत यश अपयश बरोबर आपल्या कौशल्य नुसार करिअर ची दिशा ठरविण्याबाबत आवाहन केले. *जीवनातील अनेक निर्णय स्वतः घ्या परंतु जीवनसाथी निवडण्याचा निर्णयात आई वडिलांना सोबत घ्या* असे कळकळीचे आवाहन त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले. तसेच येणारा काळ हा ए. आय. चा असुन विद्यार्थ्यांनी त्यावर लक्ष केंद्रित करावे असे ही त्यांनी सांगितले.
इ. 10 वी च्या 25 व्या बॅच च्या शुभेच्छा समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष श्री. अविनाश राणे यांनी 25 व्या बॅच च्या इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी आणि विद्यालयाच्या गौरवशाली निकालाची परंपरा अशीच सुरू ठेवण्यात विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी ज्ञानेंद्र प्रविण पाटील या विद्यार्थ्याने आपल्या स्वरचित कवितेतून शिक्षक , शाळा आणि संस्था संचालकांबद्दल ऋण व्यक्त केले तसेच पियुषा पाठक या विद्यार्थिनीने आपल्याला बालवाडी पासून 10 वी पर्यंत घडविणाऱ्या प्रत्येक शिक्षकाबद्दल गौरवोद्गार काढत आपल्या कृतज्ञ भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांना बदललेली परीक्षा पध्द्त, सी सी टी व्ही कॅमेरे , झूम मिटिंग, आदी बाबींची विद्यार्थ्यांना माहिती दिली आणि कॉपीमुक्त परीक्षेचा संकल्प करून आदर्श परीक्षार्थी म्हणून नावलौकिक मिळवा अशा शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावरील आदर्श आचारसंहिता बाबत स्पष्टीकरण केले. आरोग्य आणि परीक्षेचा ताण याचे संतुलन साधून सर्वोच्च निकाल आपल्या बाजूने खेचून आणण्यासाठी शुभेच्छा दिल्या त्या नंतर सौ.विजया पाटील मॅडम यांनी परीक्षेला सामोरे जातांना काय काळजी घ्यावी या वर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्र संचलन आर. के. माने यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साठी श्री. पी.सी पाटील व श्री.व्ही.ए. निकम व सर्व शिक्षक आणि कर्मचारी वृंद यांनी परीश्रम घेतले.
