रितेश ने केला पेंटरचा दहा हजार रुपये किंमतीचा मोबाईल परत


  बातमी प्रामाणिकपणाची..! रितेश ने केला पेंटरचा दहा हजार रुपये किंमतीचा मोबाईल परत


चोपडा,दि.७( प्रतिनिधी): आजच्या कलियुगात प्रामाणिकपणा आणि संस्कार यांची कमतरता जाणवते. अशा काळातही काही दुर्मिळ तरुण आपला संस्कार, प्रामाणिकपणा आणि चारित्र्य जपत समाजात वेगळी ओळख निर्माण करताना दिसतात.दि. ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता रवींद्र खंडू पाटील उर्फ रवी पेंटर हे खेड्यावरून गावाकडे परतत होते. शासकीय विश्रामगृह ते लोहाना पेट्रोल पंप दरम्यान लक्झरी बस स्टॉपजवळ त्यांच्या खिशातून १०,००० रुपये किमतीचा ओपो मोबाईल खाली पडला. मोबाईल हरवल्याचे लक्षात येताच रवी पेंटर अतिशय बेचैन आणि तणावग्रस्त झाले.

  तेव्हा त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या पंकज विद्यालयाचे शिक्षक आर. डी. पाटील सरांनी त्यांना धीर दिला. रवी पेंटर यांनी आपला मोबाईल क्रमांक दिल्यानंतर आर. डी. पाटील सरांनी त्या क्रमांकावर कॉल केला.

  कॉल उचलणाऱ्या एका तरुणाने प्रामाणिकपणे मोबाईल सापडल्याचे सांगितले. आर. डी. पाटील सरांनी त्याच्याशी विश्वासाने बोलून त्याला साईराम लक्झरी जवळ येण्यास सांगितले. काही वेळातच तो तरुण तेथे येऊन मोबाईल सुरक्षित परत केला.

   आर. डी. पाटील सरांनी त्याचे नाव व पत्ता विचारल्यावर त्या तरुणाने आपले नाव रितेश रामकृष्ण पुनवते असल्याचे सांगितले. रितेश सध्या बी. फार्मसी अंतिम वर्षाचा विद्यार्थी असून, विद्याविहार कॉलनीत राहतो आणि पाटील हॉस्पिटलमध्ये काम करतो.

   या प्रसंगी उपस्थित सर्वांनी रितेशच्या प्रामाणिकपणाचे मनापासून अभिनंदन केले. पुणे येथील गोल्डन आर्ट स्टुडिओचे संचालक किशोर खोजे व त्यांची टीम देखील या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनीही रितेशच्या प्रामाणिकतेचे मनःपूर्वक कौतुक केले.

  रवी पेंटर यांनी या प्रसंगी भावना व्यक्त करताना सांगितले की, “आजच्या या कलियुगात रितेशसारखे प्रामाणिक व संस्कारी तरुण समाजासाठी आदर्श आहेत. अशा वृत्तीच्या तरुणांची संख्या वाढली पाहिजे.”

 रवी पेंटर यांनी रितेशचे वैयक्तिकरित्या अभिनंदन केले व आभार मानले. या प्रसंगातून समाजात अजूनही प्रामाणिकतेची भावना जिवंत असल्याचे प्रत्यंतर आले असून, रितेश पुनवते यांची कृती सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने