शिक्षणशास्त्र महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी साकारल्या आकर्षक शाडू मातीच्या गणेश मूर्ती..कला शिक्षिका प्राध्यापक मीनल पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिले प्रशिक्षण
चोपडा दि.७(प्रतिनिधी)गणपती उत्सवाच्या निमित्ताने चोपडा येथील चोपडे शिक्षण मंडळ संचलित, शिक्षणशास्त्र महाविद्यालय व अध्यापक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण पूरक शाडू मातीची मूर्ती बनविण्याची दोन दिवशीय कार्यशाळा घेण्यात आली. पर्यावरण पूरक शाडू मातीची मूर्ती विद्यार्थ्यांनी स्वतः तयार करावी . स्व निर्मितीचा आनंद घ्यावा आणि आपल्या घरी पर्यावरण पूरक गणपती बसवावा असा संदेश विद्यार्थ्यांना या कार्यशाळेत देण्यात आला. संस्कृती रक्षण आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने सर्व विद्यार्थ्यांना कलाशिक्षिका प्रा. मीनल पाटील यांनी प्रशिक्षण दिले. प्रथम दिवशी गणपतीच्या आकर्षक मूर्ती साकारण्यात आल्या व द्वितीय दिवशी मूर्तीचे रंगकाम व सजावट करण्यात आली. प्लास्टर ऑफ पॅरिस च्या मुर्त्यांचे विघटन होत नाही या मुर्त्या नैसर्गिक तलाव, नदी यांचे प्रदूषण घडवून आणतात. त्यांचे विघटन न झाल्यामुळे नदी तलावाचे पाणी ओसरल्यावर अस्ताव्यस्त अवस्थेमध्ये या मुर्त्या पडलेल्या असतात त्यामुळे त्यांची विटंबना देखील होते. ते प्रदूषण थांबावे व भावी शिक्षकांच्या मनात पर्यावरण विषयक जाणीव जागृती निर्माण व्हावी तसेच पुढील काळात हे शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांमध्ये देखील पर्यावरण विषयक जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतील. या दृष्टिकोनातून विद्यार्थी कल्याण विभाग अंतर्गत प्रा.डॉ. सविता जाधव, कला शिक्षिका मिनल पाटील,प्राचार्य डॉ.रजनी सोनवणे, अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य प्रा .किरण पाटील, यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण पूरक शाडू मातीच्या गणपती बनवण्यासाठी प्रोत्साहित केले. कार्यशाळेत 50 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. आणि आकर्षक शाडू मातीच्या गणपती मूर्ती तयार करण्यात आल्या. या मूर्ती आपल्या घरी गणेश चतुर्थीच्या दिवशी स्थापन करण्याचा विद्यार्थ्यांनी संकल्प केला आहे. कार्यशाळेमध्ये प्राचार्य डॉ .रजनी सोनवणे, डॉ. सविता जाधव, प्रा.मीनल पाटील,प्रा. सुजय धनगर, प्रा. एम एन मराठे, प्रा. रुश्मी शेख, प्रा.पूजा माळी, ग्रंथपाल एम. एल. पटेल यांनी सक्रिय सहभाग घेत स्वतः गणपती मूर्ती साकारल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व कर्मचारी वृंदाचे सहकार्य लाभले