मंत्री गिरीश महाजन व कृषी मूल्य आयोग अध्यक्ष पाशा पटेल यांच्या उपस्थितीत जामनेरमध्ये महत्त्वपूर्ण कृषी बैठक संपन्न
♦️बांबू शेतीतून ऊर्जा, पर्यावरण आणि स्वावलंबनाचा नवा मार्ग — शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या स्थापनेवरही भर देण्याचा निर्णय
जामनेर ता. २७ जुलै(प्रतिनिधी):राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष मा. श्री. पाशा पटेल यांनी आज जामनेर येथे आपत्ती व्यवस्थापन आणि जलसंपदा मंत्री मा. ना. गिरीशभाऊ महाजन यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीच्या निमित्ताने आयोजित कृषी विषयक बैठकीत जामनेर तालुक्यातील कृषी विकास, ऊर्जेचे पर्यायी स्रोत, पर्यावरणीय समतोल आणि शेतकऱ्यांच्या सामूहिक आर्थिक उन्नतीसाठी उपाययोजना यावर सखोल चर्चा झाली.
या बैठकीत बांबू लागवडीला विशेष प्राधान्य देण्यात आले. यावेळी पाशा पटेल यांनी स्पष्ट केले की, बांबू ही निसर्गाने दिलेली एक अद्भुत देणगी असून तो अल्प पाण्यावर तग धरणारा, जलद वाढणारा, पर्यावरणपूरक आणि उत्पन्नदायक आहे. बांबू केवळ शेतीपूरता मर्यादित नसून ऊर्जानिर्मिती, इंधन, औद्योगिक वापर आणि हरित पट्टा विस्तारासाठीसुद्धा अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या तसेच शासकीय मोकळ्या जमिनींबरोबरच खाजगी शेतजमिनींवरही बांबू लागवड केली पाहिजे, असे मत त्यांनी मांडले.
राज्य शासनामार्फत बांबू लागवडीसाठी प्रतिहेक्टर अनुदान दिले जाते, याचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
पाशा पटेल यांनी यावेळी एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले. त्यांनी सांगितले की,बांबूपासून इंधन आणि ऊर्जा क्षेत्रासाठी पुढील प्रकारे उपयोग करता येतो:
दगडी कोळशाच्या पर्याय म्हणून चारकोल तयार होतो
थर्मल पॉवर प्लांटमध्ये ७% कोळसा कमी करून बांबू बायोमास वापरता येतो
डिझेल व पेट्रोलला पर्याय म्हणून बांबूपासून इथेनॉल तयार करता येतो
बायोफ्युएल व बायोमासचा स्थिर व पर्यावरणपूरक स्रोत म्हणून बांबूचा वापर होतो.भुसावळ औष्णिक वीज प्रकल्पात सध्या ७ टक्के दगडी कोळशाऐवजी बायोमास वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भविष्यात अशा प्रकल्पांमध्ये बांबूचा वापर वाढण्याची अपेक्षा आहे.
बांबूच्या लागवडीद्वारे ऊर्जा, पर्यावरणीय संरक्षण आणि शाश्वत उत्पन्न यांचा त्रिवेणी संगम साधता येतो. त्यामुळे बांबू शेतीला केवळ शेती नव्हे, तर राष्ट्रीय ऊर्जा स्वावलंबनाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे, असे स्पष्ट मत त्यांनी मांडले.
या बैठकीत पाशा पटेल यांनी शेतकऱ्यांना ‘फार्मर प्रोड्युसर कंपनी’ (FPC) स्थापन करून एकत्रितपणे उत्पादन, प्रक्रिया आणि विक्री या प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावेल, रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि शाश्वत शेतीला बळ मिळेल.
आजच्या जागतिक पर्यावरणीय संकटाच्या पार्श्वभूमीवर तापमानवाढ, ढगफुटी, महापुर आणि वनविसारख्या आपत्ती वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर दोनच पर्याय उरले आहेत — हरित पट्टा वाढवणे आणि जीवाश्म इंधनांचा वापर कमी करणे. हे दोन्ही उद्दिष्टे पूर्ण करण्यात बांबू लागवड अत्यंत प्रभावी ठरू शकते, असे यावेळी अधोरेखित करण्यात आले. बांबू २४ तासात तीन फूट वाढतो, जमिनीची धूप रोखतो आणि मोठ्या प्रमाणात कार्बन शोषण करतो, ही त्याची विशेषता आहे.
या बैठकीस जिल्हा कृषी अधिकारी कुर्बान तडवी, तहसीलदार नानासाहेब आगळे, गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे, तालुका कृषी अधिकारी जितेंद्र पाटील, विविध शेतकरी नेते, ग्रामपंचायत पदाधिकारी, कृषी तज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीचा प्रमुख उद्देश म्हणजे शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत बांबू लागवडीतून हरित क्षेत्र वाढवणे, ऊर्जेच्या पर्यायी स्रोतांना चालना देणे आणि शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण साधणे हा होता. मंत्री गिरीशभाऊ महाजन आणि पाशा पटेल यांच्या मार्गदर्शनातून जामनेर तालुक्यातून सुरू झालेली ही बांबू चळवळ राज्यभर एक हरित क्रांती घडवेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.